सलीम कुत्ता याची वर्ष १९९८ मध्येच हत्या झाली ! – आमदार कैलास गोरंट्याल, काँग्रेस

आमदार कैलास गोरंट्याल

नागपूर – वर्ष १९९३ च्या मुंबई बाँबस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याची वर्ष १९९८ मध्येच हत्या करण्यात आली होती, असा दावा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी १८ डिसेंबर या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना केला. त्यांच्या या दाव्यामुळे ‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांच्यावर केलेल्या आरोपांतील सलीम कुत्ता कोण ?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एका छायाचित्राद्वारे सुधाकर बडगुजर एका मेजवानीत सलीम कुत्तासमवेत नाचत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते हा सलीम कुत्ता वर्ष १९९३ च्या बाँबस्फोटातील आरोपी आहे. त्यामुळे या प्रकरणी स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन करून स्थिती स्पष्ट करावी, अशी त्यांनी मागणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या सूत्रावरून ठाकरे गटाला धारेवर धरले होते. या पार्श्वभूमीवर आमदार कैलास गोरंट्याल यांनी वरील विधान केले.

कैलास गौरंट्याल म्हणाले की, सलीम कुत्ता हा कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याचा उजवा हात होता. त्याची वर्ष १९९८ मध्ये रोहित वर्मा, बाळू ठाकरे आणि संतोष शेट्टी या तिघांनी हत्या केली होती. सलीम याला ३ पत्नी होत्या. टाडा न्यायालयात या तिन्ही महिलांनी आपला पती सलीम कुत्ता मारला गेल्यामुळे आमची संपत्ती परत करा, अशी विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने जप्त केलेली संपत्ती सलीम कुत्ता याच्या कुटुंबियांना परत केली होती.