|
नागपूर – पुणे जिल्ह्यातील दौंड येथे शासकीय पशूवधगृहाचे बांधकाम चालू आहे. सरकारने या पशूवधगृहाची अनुमती रहित करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती सकल हिंदु समाजाचे नेते आणि विहिंपचे श्री. नितीन वाटकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली. या संदर्भात त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
श्री. नितीन वाटकर म्हणाले की,
१. पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील तमाम हिंदु धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या भीमा अन् चंद्रभागा नदीवर, तसेच श्रीक्षेत्र सिद्धटेक गणपति मंदिराच्या लगत हे पशूवधगृह आहे.
२. दौंड येथील स्थानिक आमदाराने वर्ष २०१९ मध्ये सरकारकडून हे सर्वांत मोठे शासकीय यांत्रिक पशूवधगृह संमत करून आणले आहे. विशिष्ट समाजाच्या लाभासाठी हे पशूवधगृह बांधले जात आहे.
३. शासकीय नियमानुसार बारामती येथे पशूवधगृह असतांना जवळपासच्या अंतरावर पशूवधगृहास अनुमती देता येत नाही. त्यामुळे हे पशूवधगृह अनधिकृतपणे संमत करण्यात आले आहे.
४. या पशूवधगृहास हिंदु धर्मीय, तसेच जैन, शीख, बौद्ध आणि वारकरी संप्रदाय यांच्याकडून विरोध होत आहे.
५. ‘नवीन पशूवधगृहात म्हशींची कत्तल करण्यात येईल’, असे सांगितले जात असले, तरी सध्या तेथे किंवा आसपास देशी गोवंशियांची तस्करी आणि हत्या मोठ्या प्रमाणात होत आहे.
६. प्रतिदिन पोलीस कारवाई करून गोवंश आणि गोमांस पकडून तेथील कुरेशी यांच्यावर गुन्हे नोंदवत आहेत. यापूर्वी याच परिसरात देशी गोवंशियांची हत्या आणि गोमांस तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. तशी अनेकांवर कायदेशीर कारवाईसुद्धा झालेली आहे.
७. आरोग्याच्या दृष्टीने दौंड शहर आणि आसपास रहाणार्या नागरिकांकडून त्यांची मते आणि हरकती मागवलेल्या नाहीत.
८. पर्यावरणाच्या दृष्टीने हे पशूवधगृह घातक आहे. पंढरपूर येथे जाणार्या चंद्रभागा नदीजवळ हे पशूवधगृह असून यातील दूषित रक्ताचे पाणी नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे चंद्रभागेची विटंबना होईल. याला वारकरी संप्रदायाचा विरोध आहे.
९. पशूवधगृहापासून ६० फुटांच्या अंतरावर मारुतीचे मंदिर आहे. त्यामुळे हिंदु समाजाचा याला कडाडून विरोध आहे.
१०. सरकारने राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा केला. हे हिंदु धर्म आणि गोमातेचे रक्षण करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे; मात्र या पशूवधगृह बांधकामास अनुमती देणे चुकीचे आहे. सकल हिंदु समाजाचा याला विरोध आहे.
११. आपले सरकार हिंदुत्वनिष्ठ आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हिंदु समाजाच्या भावनेचा आदर करून तात्काळ या पशूवधगृहाची अनुमती रहित करावी, अशी हिंदूंची मागणी आहे.