रुग्णालयातील परिचारकांच्या संपामुळे ससूनमध्ये दिवसभरात केवळ आठच शस्त्रक्रिया !

पुणे – सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी संप पुकारल्याने ससून रुग्णालयामध्ये दिवसभरात केवळ आठच शस्त्रक्रिया झाल्या. ६०० परिचारिका संपावर गेल्याने तातडीच्या शस्त्रक्रिया करून इतर नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. ‘महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशन, पुणे’च्या वतीने हा संप केला आहे. परिचारिकांची पदे तातडीने भरावीत, बक्षी समिती खंड दोनमध्ये परिचारिकांवर झालेला वेतन त्रुटीचा अन्याय दूर करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे आणि खासगीकरण कंत्राटी करण्याचे धोरण रहित करावे, अशा परिचारिकांच्या मागण्या असल्याची माहिती असोसिएशनच्या कार्याध्यक्ष प्रज्ञा गायकवाड यांनी दिली. ससून रुग्णालयातील रुग्णव्यवस्था विस्कळीत होऊ नये म्हणून ससूनच्या नर्सिंग महाविद्यालयातील ११८, सिंबायोसिस नर्सिंग महाविद्यालयातील १४, भारती विद्यापीठातील ६३ आणि एम्.आय. एन्.एच्. ससून मधील ९ विद्यार्थ्यांना पाचारण केले आहे.

संपादकीय भूमिका :

या संपामुळे रुग्णांची झालेली हानी कोण आणि कशी भरून काढणार ?