अयोध्या येथील अक्षता कलशांचे सातारा येथे उत्साहात स्वागत !

सातारा, ११ डिसेंबर (वार्ता.) – अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी प्रभु श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या महासोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या येथून आलेल्या अभिमंत्रित ४१ अक्षता कलशांचे सातारा येथे शोभायात्रेच्या माध्यमातून भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी ढोल-ताशे, तुतारी, शिंगाच्या गजरात आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषात संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते.

या शोभायात्रेमध्ये सज्जनगड येथील समर्थ रामदासस्वामी संस्थानचे पू. भूषण स्वामी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी ज्ञानेश्वर मते, विश्व हिंदु परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय गाढवे, रवींद्र ताथवडेकर, संयोजन समितीचे अमित कुलकर्णी, अतुल शालगर, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे, माणचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी सौ. प्रिया शिंदे, तसेच विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना, भाजप, शिवसेना आदी राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी आणि सहस्रो श्रीराम भक्त सहभागी झाले होते.

शोभायात्रेसाठी हौद ते गोलबाग या परिसरात स्वागत कमाणी उभारण्यात आल्या होत्या. शहरातील न्यू इंग्लिश स्कूल येथून अक्षता कलश शोभायात्रेला प्रारंभ झाला. मोती चौक, पंचमुखी गणपति मंदिर, ५०१ पाटी, शेटे चौक, कमाणी हौद, राजपथमार्गे मारवाडी चौक, न्यू इंग्लिश स्कूल येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली. या वेळी न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शोभायात्रेच्या रस्त्यावर भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तसेच ठिकठिकाणी सरबत वाटप आणि मिठाई वाटप करण्यात येत होते. २२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथील कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातून ५० सहस्रांहून अधिक रामभक्त जाणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.