पुणे – देशभरातील ६४ लाख गुंतवणूकदारांची ५ सहस्र कोटी रुपयांची फसवणूक करणार्या समृद्ध जीवन घोटाळ्यातील पसार आरोपी रामलिंग हिंगे याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सातारा रस्ता परिसरात अटक केली आहे. समृद्ध जीवन समूहाचा सर्वेसर्वा मुख्य आरोपी महेश मोतेवार आणि रामलिंग हिंगे यांनी ‘समृद्ध जीवन फूड्स इंडिया’ आणि ‘समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी’च्या देशभरात शाखा उघडल्या. या माध्यमातून त्यांनी गुंतवणूकदारांची ४ सहस्र ७२५ कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर हिंगे पसार झाला होता. मागील ७ वर्षांपासून तो पुण्यात ओळख लपवून रहात होता.
समृद्ध जीवन समुहाविरुद्ध देशभरात २६ गुन्हे प्रविष्ट आहेत. या गुन्ह्यांतील २५ आरोपींपैकी महेश मोतेवारसह १६ जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.