४ सहस्र अंगणवाड्यांना कुलूप !
सातारा, ६ डिसेंबर (वार्ता.) – अंगणवाडी सेविकांना प्रतिमास २६ सहस्र रुपये आणि मदतनीसांना २० सहस्र रुपये मानधन द्यावे, कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा यांसह अन्य मागण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अनिश्चित काळासाठी संप चालू केला आहे. या संपामध्ये ७ सहस्रांहून अधिक सेविका आणि मदतनीस सहभागी झाले आहेत. या संपामुळे सातारा जिल्ह्यातील ४ सहस्र अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याविषयी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहेत; मात्र चर्चा आणि आश्वासनाविना काही मिळाले नाही. त्यामुळे राज्यव्यापी संप चालू करण्यात आला आहे. मागील आठवड्यामध्ये संबंधितांना संपाविषयी निवेदन देण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध संघटनांनी सरकार विरोधात आंदोलने चालू केली आहेत.
अंगणवाडी सेविकांनी केलेल्या मागण्या
१. अंगणवाडी कर्मचार्यांची पदे ही वैधानिक असून त्यांना मिळणारा मोबदला म्हणजेच वेतन आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचारी घोषित करण्यात यावे, त्यानुसार वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ द्यावा.
२. महागाई निर्देशांकाला जोडून प्रति ६ मासांनी मानधनात वाढ करावी.
३. कर्मचार्यांचा निवृत्तीवेतनाचा प्रस्ताव सिद्ध करून तो येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये संमत करावा.
४. पोषण आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प आहे. त्यामुळे बालकांचे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी ते वाढत चालले आहे. यासाठी आहाराचा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ रुपये आणि अतीकुपोषित बालकांसाठी २४ रुपये करण्यात यावा, या आणि इतर मागण्या आंदोलकांच्या वतीने सरकारकडे करण्यात आलेल्या आहेत.