पालकमंत्री आणि प्रशासन यांच्या प्रयत्नांना मूर्त रूप !
मालवण – नौदलदिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारायचा होता; मात्र काही अडचणींमुळे तेथे पुतळा उभारण्यात यश येत नसल्याचे लक्षात येताच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा उपकिल्ला असलेल्या; परंतु सध्या पूर्णत: भग्नावस्थेत असलेल्या राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व यंत्रणा आणि प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे कार्यालय आणि नौदलाच्या सहकार्याने राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. केवळ पुतळाच उभारला नाही, तर तेथील परिसरही आकर्षक करण्यात आला. २ मासांत नौदलदिन आणि पुतळा उभारणीचे काम पूर्ण करणार असल्याचे ठरवण्यात आले. ‘मनावर घेतले, तर एखाद्या परिसराचा कसा कायापालट होऊ शकतो’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नौदलदिन आणि पुतळा उभारणी यांच्या निमित्ताने येथे झालेली विकास कामे होत.
मालवणचे रूप २ मासांत पालटले !
नौदलदिनाच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून मालवण आणि परिसराचे रूप पालटून गेले आहे. मालवण शहर आणि कार्यक्रमाचे ठिकाण या परिसरातील रस्ते चांगले करण्यात आले. या मार्गांवरील गतीरोधकही काढण्यात आले. रस्त्यांवरील भिंती आणि घरांच्या भिंती रंगवण्यात आल्या आहेत. त्यांवर सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि स्वच्छता विषयक संदेश देण्यात आले आहेत. त्यांसह पक्षी, प्राणी यांचीही भित्तीचित्रे आहेत. अनेक भित्तीचित्रांमध्ये मालवणसह कोकणच्या परंपरा दर्शवण्यात आल्या आहेत. नारळी पौर्णिमा, दशावतार, लोककला आदींचाही यामध्ये समावेश आहे. यासह पूर्णत: भग्नावस्थेत असलेल्या राजकोट किल्ल्यालाही नवे रूप देण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासह प्रति राजकोट किल्ला उभारण्यात आला आहे. येथील अनेक शासकीय वास्तूंना रंगरंगोटी करून नवे रूप देण्यात आले आहे.
नौदलदिनाच्या कार्यक्रमाची क्षणचित्रे !
१. नौदलदिनाच्या मुख्य कार्यक्रमाच्या पूर्वी प्रतिदिन तारकर्ली समुद्रकिनारी नौदलाकडून कार्यक्रमाची रंगीत तालीम करण्यात आली.
२. मुख्य कार्यक्रमासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून दुपारनंतर मालवण आणि तारकर्ली येथील कार्यक्रम परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले होते.
३. नौदलाच्या तळापासून प्रथमच लांबच्या ठिकाणी नौदलदिन साजरा करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे स्थान मुंबईपासून ५५० कि.मी. आणि नौदलाच्या गोवा राज्यातील तळापासून १३५ कि.मी. अंतरावर आहे. असे असतांनाही नौदलाचे सामर्थ्य जनतेपर्यंत पोचवणे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी नौदलाचे योगदान सर्वांना कळावे, यासाठी हा कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले.
४. वर्ष १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धात भारतीय नौदलाने कराची बंदरावर केलेल्या साहसी आक्रमणाची आठवण म्हणून ४ नोव्हेंबर हा दिवस ‘विजय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
५. या कार्यक्रमात मिग २९ के आणि नौदलाचा समावेश असलेल्या ४० विमानांसह २० युद्धनौका सहभागी झाल्या होत्या. नौदलाच्या मरीन कमांडोजनी भर समुद्रात, तसेच किनार्यावरील शोध आणि बचाव कार्य अन् शत्रूवर प्राणघातक आक्रमणाची प्रात्यक्षिके करून दाखवली. यासह नौदलाचे बँडपथक, एन्.सी.सी. कॅडेट्सचे ड्रिल आणि हॉर्नपाईप नृत्य अन् त्यांनतर नौकांवर आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर विद्युत् रोषणाई (लेझर शो) करण्यात आली.
६. कार्यक्रमांची ठिकाणे, मंडप परिसर, वाहनतळ या सर्व भागांत सी.सी.टी.व्ही. लावण्यात आले होते.
७. या सोहळ्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावरही स्वच्छता करण्यात आली. येथे वाढलेली झुडपे, गवत कापून परिसर स्वच्छ करण्यात आला. किल्ल्यावर असलेल्या मंदिरांनाही रंगरंगोटी करण्यात आली. सिंधुदुर्ग किल्ल्याची डागडुजीही काही प्रमाणात करण्यात आली.