|
नागपूर – देशातील २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांतील ६०३ नद्यांपैकी ३११ नद्या प्रदूषित असल्याचे दिसून आले. धक्कादायक गोष्ट म्हणून देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांच्या सूचीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रात ५५ नद्या प्रदूषित आहेत. त्या खालोखाल १९ नद्यांसह मध्यप्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो.
देशातील नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ‘नॅशनल वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग प्रोग्रॅम’ची कार्यवाही करत असते. या वर्षी ६ जानेवारी २०२३ मध्ये हा अलीकडील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात ही माहिती समोर आली. प्रदूषित नद्यांना स्वच्छ करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्यशासनाकडून कृती आराखडा सिद्ध केला जातो. नदी पुनरुज्जीवित समिती आणि केंद्रीय निरीक्षण समितीच्या वतीने प्रगतीवर लक्ष ठेवले जाते.
वर्ष २०१९ आणि २०२१ या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतेक नद्यांचे १५६ नमुने घेतले. त्यातील ५ नदींचे १४७ ठिकाणी घेतलेले नद्यांच्या पाण्याचे नमुने बीओडी मानकांच्या पडताळणीत प्रदूषित आढळले. महाराष्ट्रातील मिठी, मुळा, सावित्री आणि भीमा या सर्वाधिक प्रदूषित, तर त्यानंतर क्रमाने गोदावरी, मुळा, पावना, कन्हान आणि मुळा-मुठा प्रदूषित आढळल्या.
उद्योगाचे सांडपाणी नद्यांमध्ये !सर्व उद्योगांना प्रदूषण नियंत्रण यंत्रणा लावणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही नद्या प्रदूषित होतात; कारण उद्योजक प्रदूषण नियंत्रण यंत्रणा एकतर लावत नाहीत, लावली तर त्या सतत चालू ठेवत नाहीत. प्रदूषण मंडळाचे याकडे लक्ष नाही किंवा तिथे भ्रष्टाचार होतो. सांडपाणी अलीकडे उद्योगापेक्षा गावे, महापालिका आणि महानगरपालिका क्षेत्रांतून निघणारे सांडपाणी हे बहुतेक नद्या प्रदूषणास कारणीभूत आहे. या सांडपाण्यात मोठ्या प्रमाणावर तेल, डिटर्जंट, विविध जड धातू, रसायने, शहरातील नाल्यावाटे वहात आलेला प्लास्टिक किंवा जैविक कचरा असतो. शेतीमधील कीटकनाशके, रासायनिक खते, प्राण्यांची विष्ठा आणि जैविक कचरा नद्यांच्या सर्वसाधारण प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर भर घालतो. |
संपादकीय भूमिका
|