रुग्णाईत व्यक्तीची सेवा साधना म्हणून कशी करावी ?

‘एखादे आजारपण म्हणजे मनुष्याच्या आयुष्यातील प्रतिकूल कालावधीच असतो. आजाराचे स्वरूप मंद, मध्यम किंवा तीव्र असेल, त्यानुसार त्या व्यक्तीवर आजाराचा होणारा परिणाम अवलंबून असतो. सर्वसाधारण व्यक्ती आजारपणामुळे खचून जाते. ‘जणू आता सर्वकाही संपले’, असे त्या व्यक्तीला वाटत असते. घरातील अन्य कुटुंबीयही तीच भावना बाळगून दुःखी, कष्टी आणि पीडित होतात. अशा त्रासदायक आजारपणात केवळ साधना केल्यानेच रुग्णाईत व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय आनंदी राहू शकतात. कितीही मोठे आजारपण असले, तरी साधना केल्यासच एखादी व्यक्ती त्यातून तरून जाऊ शकते.

 शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या कारणांमुळे आजार होत असतात. ‘त्यानुसार होणारी रुग्णाची स्थिती, त्याच्या कुटुंबियांची त्या कालावधीत असणारी महत्त्वपूर्ण भूमिका आणि साधनेचे महत्त्व’, या संदर्भातील सूत्रे येथे दिली आहेत. येत्या आपत्काळात आजारांचे प्रमाण वाढणार आहे. तेव्हा ‘त्या प्रतिकूल स्थितीला कसे सामोरे जायचे ?’, याविषयीची आवश्यक सूत्रे या लेखातून शिकायला मिळतील.

प्रत्येक व्यक्तीला होणार्‍या आजाराचे स्वरूप निरनिराळे असते, उदा. अर्धांगवायू, अस्थिभंग, हृदयरोग, कर्करोग, कमरेपासून पायातील शक्ती जाणे इत्यादी. काही रुग्ण काठी घेऊन, तर काही ‘वॉकर’ घेऊन चालू शकतात, तर काही जण पूर्णपणे झोपून असतात. अशा स्थितीत ‘त्यांची काळजी कशी घ्यायची ? आणि त्यातून आपली साधना कशी होते ?’, याविषयी आपण या लेखातून जाणून घेऊया.  (भाग १)

१. रुग्णाची स्थिती

श्रीमती मनीषा गाडगीळ

काही आजार गंभीर स्वरूपाचे असतात. रुग्णाची स्थिती काही वेळा दिवसभर किंवा काही वेळा दिवसातून २ – ३ वेळा नाजूक असते. रुग्णाचे वय, आजार आणि मानसिक स्थिती यांवर रुग्णाची स्थिती अवलंबून असते. ‘रुग्णाची शारीरिक आणि मानसिक स्थिती कशी आहे ?’, याचा अभ्यास करायला हवा, उदा. काही रुग्ण झोपून असल्यास त्यांचे अंग पुसणे, त्यांना जेवण भरवणे, अशा त्यांच्या अनेक वैयक्तिक गोष्टींत कुटुंबियांना साहाय्य करावे लागते. एखादा रुग्ण काठीच्या आधारे चालत असल्यास ती व्यक्ती काही वेळा तोल जाऊन पडण्याची शक्यता असते. यासाठी त्या रुग्णाकडे सतत लक्ष ठेवावे लागते. काही रुग्णांमध्ये कटीपासून पायापर्यंत शक्ती नसल्याने ते झोपून असतात. अशा रुग्णांना पाहिजे त्या वेळेत साहाय्य करावे लागते. एकूणच अशा रुग्णाची त्याचे कुटुंबीय किंवा आश्रमातील साधक यांना पुष्कळ काळजी घ्यावी लागते.

२. रुग्णाला होणार्‍या त्रासांचे प्रकार आणि त्या अनुषंगाने त्यांची घ्यावयाची काळजी

२ अ. शारीरिक

२ अ १. रुग्णाच्या स्थितीनुसार त्याच्या अवयवांची हालचाल हळूवारपणे करावी ! : एखाद्या रुग्णाच्या पायाला अधिक त्रास असतो, तर कुणाचा हातच हलत नाही. एखादा रुग्ण पुष्कळ वयस्कर असल्यास त्याच्या सर्वच अवयवांमध्ये शिथिलता आलेली असते. त्याची स्थिती समजून घेऊन त्यांना जसे सुसह्य होईल, त्याप्रमाणे त्याची काळजी घ्यावी लागते.

वयस्कर रुग्णांतील शक्ती न्यून झाली असल्याने त्यांना उचलतांनाही अगदी हळूवारपणे कृती करावी लागते. काही वेळा आपण त्यांना हात लावल्यावरही त्रास होतो. इतकी त्यांची त्वचा नाजूक झालेली असते.

२ अ २. ‘रुग्ण रात्री पलंगावरून पडू नये’, यासाठी काळजी घ्यावी ! : अर्धांगवायू, सायटिका (टीप) झालेल्या किंवा एखादे हाड मोडलेल्या व्यक्तींना पलंगावर एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर वळताही येत नाही. अन्य काही रुग्णांना थोडीतरी हालचाल करता येते; परंतु असे रुग्ण रात्री बराच वेळ जागे असल्याने ते मध्यरात्री पलंगावरून पडण्याची शक्यता असते. अशा वेळी त्यांच्यासाठी दोन्ही बाजूंनी दांड्या असलेला पलंग वापरू शकतो. त्यामुळे असे रुग्ण पडण्याची शक्यता नसते.

टीप – सायटिका : कटीपासून (कमरेपासून) पायाच्या मागील भागापर्यंत पसरणार्‍या वेदना.

२ अ ३. घरातील व्यक्तींनी लक्ष ठेवून आधुनिक वैद्यांनी सांगितलेल्या वेळेनुसार रुग्णांना औषधे द्यावीत ! : ‘रुग्णाने औषध घेतले आहे ना ?’, याची निश्चिती करून घ्यावी. गोळी घेतल्याचे लक्षात न राहिल्याने काही रुग्ण एकदा घेतलेली गोळी पुन्हा घेतात. काही रुग्णांच्या हातात शक्ती नसल्यास त्यांच्या हातातून औषधाची गोळी खाली पडू शकते आणि त्यांच्या ते लक्षातही येत नाही. घरातील व्यक्तींनी लक्ष ठेवून आधुनिक वैद्यांनी सांगितलेल्या वेळेनुसार रुग्णांना औषधे द्यावीत.

२ अ ४. रुग्णाला अंघोळ घालणे

२ अ ४ अ. रुग्णाच्या मनाची स्थिती समजून घेऊन त्याला अंघोळीसाठी सिद्ध करावे आणि अंघोळ घालतांना ‘त्याला त्रास होणार नाही’, याकडे सतत लक्ष ठेवावे ! : ‘रुग्णाला कोणत्या वेळी अंघोळ घातल्यास सोयीचे होईल ?’, हे त्यालाच विचारले, तर त्याच्या मनाची सिद्धता होते; अन्यथा अंघोळीच्या वेळी ऊर्जा व्यय होऊन त्याला थकवा येतो. त्यामुळे ‘अंघोळ करूच नये’, असे त्याला वाटते. अशा वेळी रुग्णाच्या मनाची स्थिती समजून घेऊन त्याला प्रेमाने सांगावे. रुग्णाला थकवा असल्यास त्याला ३ – ४ दिवसांनी एकदा अंघोळ घालू शकतो. रुग्णाला आसंदीत बसवून अंघोळ घालू शकतो. रुग्णाला सहन होईल, इतकेच गरम पाणी अंघोळीला द्यावे. प्रार्थना करून रुग्णाला अंघोळ घालायला प्रारंभ केल्यावर अधूनमधून जयघोष करावा. रुग्ण बोलू शकत असल्यास त्यालाही प्रार्थना म्हणायला सांगावी. अन्य वेळी कोमट पाण्यात मऊ पंचा भिजवून रुग्णाचे शरीर पुसावे. रुग्णाची अंघोळ झाल्यावर त्याचे शरीर पूर्ण कोरडे करून मगच पावडर लावावी. रुग्णाच्या शरिरावर एखादी जखम असल्यास तिथे प्लास्टिक घालून कापड बांधून ठेवू शकतो. ‘त्या भागात पाणी जाणार नाही’, याची पूर्ण काळजी घ्यावी. रुग्णाचे शरीर पूर्ण कोरडे झाल्यावरच त्याला झालेल्या जखमेवर मलमपट्टी करावी. हे सर्व करतांना ‘रुग्णाला त्रास होणार नाही’, याकडे सतत लक्ष ठेवायला हवे.

२ अ ४ आ. अंघोळ झाल्यानंतर करावयाच्या काही महत्त्वाच्या कृती

२ अ ४ आ १. नखे कापणे : रुग्णाची अंघोळ झाल्यानंतर त्याची नखे कापणे सोपे जाते; परंतु अंघोळ झाल्यानंतर काही वेळा रुग्ण थकलेला असल्यास काही वेळाने रुग्णाला कोमट पाण्यात हात आणि पाय ठेवायला सांगून नंतर त्याची नखे कापावी. रुग्णाला आसंदीत बसवून त्याला पाय बालदीत ठेवायला सांगावेत आणि त्याचे पाय बादलीला जेथे टेकतात, तिथे मऊ लहानसा पातळ कपडा किंवा नॅपकीन ठेवावा. त्यामुळे बालदीचा काठ पायांना टोचत नाही. रुग्णाची नखे काळजीपूर्वक कापावीत. ‘रुग्णाला या कृतीतून आनंद मिळत आहे ना ?’, याकडे लक्ष ठेवून त्या वेळी त्याच्याशी साधनेविषयी बोलावे. त्यामुळे आपल्यालाही देवाच्या अनुसंधानात रहाता येते.

२ अ ४ आ २. जखमेवर मलमपट्टी करणे : काही वेळा रुग्ण सतत झोपून राहिल्यामुळे त्याच्या पाठीला किंवा कमरेकडील भागास जखम होते. ‘रुग्णाला जखम झाली आहे’, असे लक्षात आल्यास ती आधुनिक वैद्यांना दाखवावी. रुग्णाच्या ज्या भागात जखम असेल, तो भाग कोरडा करावा. त्यानंतर रुग्णाच्या जखमेवर मलम लावून वर पट्टी लावावी. रुग्णाला मलम लावूनही त्याची जखम बरी न झाल्यास वेळीच आधुनिक वैद्यांना दाखवून घ्यावे. लगेच औषधोपचार झाल्यास रुग्णाला त्रास होणार नाही.

२ अ ५. रुग्णाला नेहमी रुग्णालयात न्यावे लागत असल्यास करावयाची सिद्धता

२ अ ५ अ. रुग्णाला रुग्णालयात नेतांना लागणार्‍या साहित्याची सूची करावी ! : रुग्णाला काही कारणांनी अनेक वेळा रुग्णालयात न्यावे लागते. त्यामागे ‘अर्धांगवायू किंवा हृदयविकार यांचा वारंवार झटका येणे, पोटात किंवा पाठीत पाणी होणे, लघवीची नळी (कॅथेटर) पालटणे, डायलिसीस (टीप २) करणे, रक्तातील हिमोग्लोबिन न्यून होणे किंवा अन्य काही आजार’, अशी अनेक कारणे असू शकतात. रुग्णाला रुग्णालयात नेतांना आवश्यक असलेल्या साहित्याची सूची करून ठेवू शकतो. त्या सूचीनुसार रुग्णालयात साहित्य नेणे सोपे जाते.

टीप २ – डायलिसीस : मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया

२ अ ५ आ. रुग्णासाठी लागणारे साहित्य : रुग्णासाठी लागणारे साहित्य, उदा. वैद्यकीय अहवालांची धारिका (फाईल), रुग्णाची औषधे, गरम पाण्यासाठी थर्मास, पंचा, लहान रुमाल, कंगवा, टूथपेस्ट, ब्रश, ‘डायपर’ (मल-मूत्र शोषून घेण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र ), एखादे जुने कापड, आवश्यकता असल्यास रद्दी पेपर, पाणी पिण्यासाठी बाटली इत्यादी आधीच सिद्ध करून ठेवल्यास आयत्या वेळी घाई होत नाही. रुग्णाच्या समवेत असलेल्या व्यक्तीसाठी तिचे वैयक्तिक साहित्य, एक चादर, पैसे, औषधांचा हिशोब लिहिण्यासाठी काही कागद, पेन इत्यादी सिद्धता आवश्यक आहे. आपला भ्रमणभाषही आठवणीने समवेत न्यावा.

२ आ. मानसिक

२ आ १. रुग्णाच्या आजाराचे स्वरूप आणि त्याची मानसिकता यांनुसार साहाय्य केल्यास रुग्णाला आनंद मिळतो ! : प्रत्येक आजाराचे स्वरूप वेगळे असते, तसेच प्रत्येक व्यक्तीची मानसिकता तिच्या स्वभावानुसार किंवा तिच्या आजाराप्रमाणेही असू शकते. रुग्णाची मानसिकता सांभाळून सर्व कृती कराव्या लागतात, उदा. रुग्ण वयस्कर असल्यास त्याने अनेक वर्षे लवकर उठून अंघोळ केलेली असते. त्यामुळे त्याला त्या ठरलेल्या वेळेतच अंघोळ करायची असते. अशा वेळी आपल्याकडून थोडा उशीर झाला, तर त्या रुग्णाची मानसिक स्थिती बिघडते, तसेच त्याला प्रत्येक गोष्ट स्वतः ठरवलेल्या वेळेतच करायची असते. त्यामुळे रुग्णाच्या अल्पाहार किंवा जेवण करण्याच्या वेळांमध्ये पालट केल्यास त्याची चिडचिड होते. काही वेळा रुग्णाला समजावून सांगितल्यास तो ऐकतो; परंतु प्रत्येक वेळी तो ऐकेलच, असे नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याला त्याच्या ठरलेल्या वेळेत सर्वकाही दिल्यास अडचण येत नाही. आपल्याला काही कारणाने विलंब होणार असल्यास त्याला तशी कल्पना दिल्यास तो शांत रहातो आणि त्यालाही ‘आपल्याला सांगितले आहे’, याचा आनंद होतो.

२ आ २. रुग्णाला आधार वाटेल, अशा कृती करून त्याला आनंद आणि समाधान देणे 

अ. एखाद्या रुग्णाला आवडता पदार्थ न खाण्याचे पथ्य असल्यास घरातील कुणीही त्याच्यासमोर त्याचा आवडता पदार्थ खाऊ नये.

आ. घरी पाहुणे येणार असल्यास रुग्णाला तशी कल्पना द्यावी. घरी पाहुणे आल्यानंतर त्यांची रुग्णाशी प्रथम भेट घालून द्यावी, म्हणजे त्याला आनंद होतो. घरातील अन्य व्यक्ती पाहुण्यांशी नंतर बोलू शकतात. पाहुणे घरून निघण्यापूर्वी रुग्ण व्यक्तीला तशी कल्पना द्यावी.

इ. काही वेळा रुग्णाला एखाद्या व्यक्तीला किंवा नातेवाइकांना भेटायचे असते. त्या वेळी आवश्यकतेनुसार त्यांच्या भेटीचे नियोजन करू शकतो. तेव्हा घरी येणार्‍या व्यक्तीला रुग्णाच्या त्रासाच्या संदर्भात आधीच सांगून ठेवावे, म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही.

ई. काही वेळा रुग्णाला बोलणे अशक्य असते. रुग्णाच्या संदर्भात कुणाचा भ्रमणभाष आल्यास त्याला ‘काय बोलणे झाले ?’, हे लगेच सांगावे. त्यामुळे रुग्णालाही आनंद मिळतो आणि ‘आपल्यासाठी आलेला निरोप सर्व जण देतात’, याविषयी रुग्णाला निश्चिती वाटते.

उ. काही वेळा रुग्णाला विशिष्ट जागी वेदना होत असतात. त्या वेळी आपण त्यांना ‘तुम्ही त्या दुखण्यावरील औषध घेतले आहे. आता वेदनेचे प्रमाण न्यून होईल’, असे सांगावे; म्हणजे त्यांच्या मनाला बरे वाटते.

ऊ. रुग्णाचे वय लहान असल्यास त्याच्या मनावर आजारपणाचा पुष्कळ परिणाम झालेला असतो. इतक्या लहान वयात आजारपण आल्यास त्याला वाटते, ‘आपले आता काही खरे नाही.’ त्याच्या दृष्टीने असे वाटणे अगदी स्वाभाविक असते. अशा वेळी आपण त्याला अधिकाधिक आधार देणे आवश्यक असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याच्याकडून साधना करून घेऊन आपण त्याला आनंद देऊ शकतो.

ए. आपण रुग्णाच्या प्रेमापोटी किंवा काळजीमुळे रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबियांना त्याच्या आजाराविषयी सतत काहीतरी विचारतो. रुग्णाला भेटायला जाण्यापूर्वी त्याच्या आजाराविषयी त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना आधीच विचारावे. रुग्णाशी त्यांच्या आजाराविषयी बोलल्यास त्याच्या मनाला त्रास होऊ शकतो. रुग्णाशी बोलतांना वातावरण हसत-खेळत ठेवण्याकडे लक्ष द्यावे. रुग्णाशी त्याच्या आवडीच्या विषयावर किंवा साधनेविषयी बोलू शकतो.

ऐ. रुग्ण पुष्कळ आजारी असल्यास कुटुंबातील एखाद्या नातेवाइकाचे किंवा ओळखीच्या व्यक्तीचे निधन झाल्यास रुग्णाचा स्वभाव आणि त्याची स्थिती यांनुसार तारतम्याने ठरवून त्याला तशी कल्पना देऊ शकतो. ‘त्यांना या गोष्टीचा कोणत्याही प्रकारे त्रास व्हायला नको’, याची काळजी घेणे आवश्यक आहे.’

– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.