बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

प.पू. कलावतीआई

१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन

‘शिष्याने गुरूंच्या सहवासात पुष्कळ दिवस जरी घालवले, तरी झोप, आळस, अप्रामाणिकपणा आणि उद्धटपणा इत्यादी दुर्गुण त्याच्या अंगी असेपर्यंत त्याची प्रगती होत नाही. शिष्याचे गुरूंच्या ठिकाणी अढळ प्रेम नसेल, तर त्यास गुरुकृपा संपादिता येत नाही. एखाद्या वैद्यावर ठेवलेल्या श्रद्धेप्रमाणे गुरूंवर श्रद्धा ठेवून काम भागत नाही. गुरूंच्या ठिकाणी शिष्याची अढळ श्रद्धा असेल, तरच शिष्य भवसागर तरू शकतो.’ – प.पू. कलावतीआई, बेळगाव  (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘शिष्य’, सुवचन क्र. २)

पू. किरण फाटक

२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन

‘गुरुने दिला ज्ञानरूपी वसा ।
आम्ही चालवू हा पुढे वारसा ।।

‘गुरूंनी आम्हाला दिलेला ज्ञानरूपी ठेवा पुढे नेण्याचे कार्य आम्ही करत राहू’, असे एका गाण्यात म्हटले आहे.

२ अ. गुरु-शिष्य हे नाते अत्यंत वेगळे आणि आयुष्याला कलाटणी देणारे असते ! : गुरु-शिष्य हे नाते अत्यंत वेगळे आणि आयुष्याला कलाटणी देणारे, असे असते. गुरुप्राप्ती होण्यासाठी जन्मोजन्मीची साधना आणि तपश्चर्या लागते. ‘गुरु मिळणे’, हा या जन्मातील एक अत्यंत चांगला आणि पवित्र असा योग असतो. खरेतर गुरु शिष्याला शोधत येतात, उदा. समर्थ रामदासस्वामी वेणाबाईंना शोधत आले आणि त्यांनी वेणाबाईंना स्वत:चे शिष्य करून घेतले.

२ आ. गुरु आणि शिष्य यांच्या प्रसिद्ध अन् आदर्श जोड्या ! : ‘वसिष्ठऋषि आणि प्रभु श्रीराम; सांदीपनीऋषि आणि कृष्ण, सुदामा; श्रीकृष्ण आणि अर्जुन; संत निवृत्तीनाथ आणि श्री ज्ञानेश्वर माऊली; समर्थ रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी; वेदधर्मऋषि आणि संदीपक; प.पू. सिद्धारूढ महाराज आणि प.पू. कलावतीआई; प.पू. तुकाई आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज; श्री स्वामी समर्थ आणि बाळाप्पा, चोळाप्पा; श्री गजानन महाराज आणि बंकटलाल’, या गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध अन् आदर्श आहेत.

२ इ. गुरूंच्या कृपेने शिष्याला ज्ञान प्राप्त होते !

२ इ १. गुरु शिष्याच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन त्याला उपदेशाचे अमृत पाजतात ! : गुरु-शिष्य संवादातून नेहमी ज्ञान प्रगट होते. शिष्याने गुरूंना अनेक प्रश्न विचारले पाहिजेत, म्हणजे गुरु त्या शिष्याला बोध करतात. गुरु त्या शिष्याच्या प्रश्नांची सर्वसमावेशक आणि अचूक अशी उत्तरे देऊन गुरुपदेशाचे अमृत त्यास पाजतात. अर्जुनाने श्रीकृष्णाला युद्धभूमीवर अनेक प्रश्न विचारले; म्हणून श्रीकृष्णाने त्यास भगवद्गीतेचे कथन केले. आज ही भगवद्गीता सर्वत्र वंद्य ठरली आहे.

२ इ २. गुरु त्यांच्या शिष्याकडून ग्रंथलिखाणाचे कार्य करून घेतात ! : समर्थ रामदासस्वामी दासबोध सांगत गेले आणि कल्याणस्वामी तो लिहित गेले; म्हणून ‘दासबोध’, या ग्रंथाची निर्मिती झाली. निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून ज्ञानेश्वर प्राकृतात भगवद्गीतेचे सार सांगत गेले आणि ‘ज्ञानेश्वरी’, या ग्रंथाची निर्मिती झाली.

२ इ ३. शिष्याच्या मनात गुरूंविषयी श्रद्धा आणि प्रेम असल्याने त्याला अध्यात्माविषयी ज्ञान प्राप्त होणे : या गुरु-शिष्यांमध्ये अलौकिक असे प्रेम होते. शिष्याच्या मनात गुरूंविषयी अत्यंत श्रद्धा, आदर आणि प्रेम होते; म्हणून त्या शिष्याला ‘आपले जीवन संपन्न कसे करावे ? आणि ‘अध्यात्माच्या वाटेवर पुढे पुढे कसे जात रहावे ?’, याचे आवश्यक ते ज्ञान झाले.

२ ई. महाराष्ट्रातील सर्व संत हे विठ्ठलालाच आपला गुरु आणि सर्वस्व मानत होते ! : महाराष्ट्रातील सर्व संत विठ्ठलालाच आपला गुरु मानत होते. नुसता गुरुच नव्हे, तर आई, वडील, बंधू, भगिनी आणि सर्व नातेवाईक मंडळी यांना ते विठ्ठलाच्या ठिकाणी बघत होते. संत नामदेव एका अभंगात म्हणतात,

गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ।।
नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला ।
म्हणून कळिकाळां पाड नाहीं ।।

अर्थ : संत नामदेव महाराज म्हणतात, ‘माझे माय-बाप, गुरु, दैवत सारे काही विठ्ठल आहे. ‘विठ्ठलाशी अनुसंधान’, हीच माझी संपत्ती आहे. मला विठ्ठल सापडलेला असल्याने आता कोणत्याही संकटाचे भय नाही !’

२ उ. गुरुसेवा कशी करावी ?

२ उ १. शिष्याने गुरूंची सेवा श्रद्धेने, एकाग्रतेने आणि न थकता केली पाहिजे ! : प्रत्येक शिष्यामध्ये सेवाधर्म असलाच पाहिजे. शिष्याने गुरूंची सेवा अत्यंत श्रद्धेने, एकाग्रतेने आणि न थकता केली पाहिजे. त्यासाठी आळस, कंटाळा आणि झोप बाजूला ठेवावी अन् सर्व परिस्थितीत मन आनंदी ठेवावे, तसेच गुरुसेवेमध्ये कुठलीही उणीव ठेवता कामा नये.

२ उ २. समर्थ रामदासस्वामींची सेवा तत्परतेने करणारे श्री कल्याणस्वामी ! : समर्थ रामदासस्वामींचे शिष्य श्री कल्याणस्वामी हे गुर्वाआज्ञेवरून दोन मोठे हंडे पाण्याने भरून खांद्यावरून सज्जनगडाच्या पायथ्यापासून सज्जनगडापर्यंत वाहून आणत होते. ही सेवा अत्यंत कठीण होती; परंतु न कंटाळता आणि कुठल्याही प्रकारची तक्रार न करता कल्याणस्वामींनी ही सेवा मोठ्या तत्परतेने केली.

२ उ ३. शिष्याने गुरूंची सेवा करतांना अप्रामाणिकपणा, लबाडी किंवा असत्य भाषण कधीही करू नये ! : ‘शिष्याने गुरूंची सेवा करतांना कुठल्याही प्रकारचा अप्रामाणिकपणा, लबाडी किंवा असत्य भाषण कधीही करू नये’, असे प.पू. कलावतीआई सांगतात. शिष्याचा असा गोड गैरसमज असतो की, आपला हा अप्रामाणिकपणा आणि आळस आपल्या गुरूंना कळणारच नाही; परंतु गुरु त्यांच्या आंतरिक शक्तीने सर्व जाणत असतात. ‘प्रत्येक शिष्य, त्याची सेवा आणि त्याचे शिकणे’, यांकडे गुरूंचे बारीक लक्ष असते.

२ उ ४. आदर्श गुरुसेवेचे मूर्तीमंत उदाहरण, म्हणजे शिष्य संदीपकाने वेदधर्मऋषींची केलेली सेवा ! : गुरुचरित्रातील ‘संदीपक’ या शिष्याने वेदधर्मऋषींची केलेली सेवा आदर्श होती. ऋषींना अनेक रोग जडले. त्यांच्या शरिरावर अनेक जखमा झाल्या. त्यांतून रक्त आणि पू येऊ लागला अन् त्याची दुर्गंधी सुटू लागली, तरीसुद्धा संदीपकाने गुरुसेवा कधीच सोडली नाही. वेदधर्मऋषि संदीपकावर बर्‍याच वेळा पुष्कळ रागवायचे आणि चिडायचे; परंतु संदीपकाने आपला धीर कधीच सुटू दिला नाही. त्याची ही सेवा पाहून साक्षात् भगवान विष्णु, ब्रह्मदेव आणि शंकर प्रसन्न झाले अन् त्याच्या समोर येऊन उभे राहिले. त्यांनी संदीपकाला ‘आम्ही तुझ्या गुरूंना बरे करतो’, असे सांगितले. संदीपकाने ही गोष्ट वेदधर्मऋषींना सांगताच ते संदीपकावर चिडले आणि ‘माझे भोग मला भोगू दे’, असे म्हणाले. त्यामुळे संदीपकाने तीनही देवांना सांगितले, ‘‘तुम्ही मला काही देऊ नका. मला केवळ गुरुसेवा करण्यासाठी बळ द्या.’’ आणि तो गुरुसेवा करत राहिला. त्याच्या गुरूंचे भोग संपल्यावर गुरूंचे शरीर अत्यंत तेजस्वी झाले आणि या गुरु-शिष्यांसाठी मोक्षाचे दार खुले झाले; म्हणून एका गाण्यात ‘गुरु परमात्मा परेशु’, म्हणजे ‘गुरु हाच परमात्मा, परमेश्वर आहे’, असे म्हटले आहे.

२ ऊ. आजच्या कलियुगातील भोंदू गुरु आणि त्यांचे तथाकथित शिष्य !

२ ऊ १. आजच्या कलियुगात चांगले गुरु आणि आज्ञाधारक शिष्य फारसे बघावयास मिळत नाहीत ! : आजकाल कुणी कुणाचे ऐकत नाही. स्वतःचे खरे करण्यास जो तो उतावीळ झालेला असतो. प्रेम दुर्मिळ होत चालले आहे. जो तो पैसा, प्रतिष्ठा, सत्ता आणि प्रसिद्धी यांच्या मागे लागला आहे. आज आपण लहान लहान गोष्टींतून मिळणारा आनंद हरवून बसलेलो आहोत.

२ ऊ २. ‘वेळ घालवण्याचे एक साधन’ म्हणून गुरूंच्या प्रवचनांचा आस्वाद घेणारे आजकालचे श्रोते ! : आजकाल गुरूंचे भाषण केवळ करमणुकीसाठी ऐकले जाते. कीर्तनकारांचे कीर्तन केवळ मनोरंजन होण्यासाठी ऐकले जाते. दूरचित्रवाहिन्यांवर अनेक गुरु त्यांच्या प्रवचनांतून गुरुपदेश देत असतात; परंतु ऐकणारे ‘वेळ घालवण्याचे एक साधन’ म्हणून या प्रवचनांचा आस्वाद घेतात. ते त्यातून काहीच शिकत नाहीत आणि त्याप्रमाणे आचरणही करत नाहीत. ते या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देतात आणि नंतर आपल्या नित्याच्या व्यवहारात मग्न होऊन जातात.

२ ऊ ३. तथाकथित गुरूंचा भोंदूपणा ! : बरेच तथाकथित गुरु शिष्यांचा भोळेपणा आणि अज्ञान यांचा गैरफायदा घेतात अन् शिष्यांच्या या अंधश्रद्धेच्या आधारावर आपले साम्राज्य देशात अन् परदेशात वाढवतात; परंतु ईश्वराच्या दरबारात ते कुठेतरी पकडले जातात आणि त्यांच्या साम्राज्याला ओहोटी लागते.

२ ऊ ४. वेगवेगळ्या विद्वानांच्या प्रवचनांतून मनात विचारांचा गोंधळ माजल्यावर लोक मार्गभ्रष्ट होतात ! : सध्या उपदेश करणारे आणि वेगवेगळ्या प्रकारे आध्यात्मिक दृष्टीकोन असलेले अनेक विद्वान आपले भाषण अन् प्रवचन यांतून लोकांवर छाप पाडतात. विचारांचे अनेक प्रवाह लोकांसमोर प्रविष्ट होतात आणि मग लोकांना समजत नाही की, कुणाचे ऐकावे अन् कुणाचे सोडावे ? विचारांचा गोंधळ माजला की, लोक मार्गभ्रष्ट होतात आणि समाजात अनिष्ट प्रवृत्ती फोफावत जातात.

२ ए. शिष्याची गुरूंवर असीम श्रद्धा असेल, तरच गुरु शिष्याला उद्धाराचा मार्ग दाखवून या भवसागरातून तारून नेतात ! : आपली प्रकृती बिघडली असतांना आपण ज्या डॉक्टरांचे किंवा वैद्यांचे औषध घेतो, त्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा असली पाहिजे, तरच आपल्याला त्यांनी दिलेल्या औषधाचा गुण येतो; परंतु ‘डॉक्टरांवरील श्रद्धा आणि गुरूंवरील श्रद्धा यांमध्ये फरक आहे’, असे प.पू. कलावतीआई सांगतात. जर शिष्याची गुरूंवर असीम श्रद्धा आणि प्रेम असेल, तरच गुरु प्रसन्न होतात अन् शिष्याला त्याच्या उद्धाराचा मार्ग दाखवून या भवसागरातून तारून नेतात.’

– पू. किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२४.८.२०२३)