भगवान व्यास

भारतातील महान ऋषि परंपरा (लेखांक १०)

‘प्राचीन काळात भारत ही एक तपोभूमी होती. ही तपोभूमी अनेक ऋषींच्या वास्तव्याने पवित्र झाली होती. कित्येक महान ऋषींनी या भूमीत वास्तव्य केले. यांपैकी कुणी राजर्षिपद मिळविले, कुणी महर्षिपद, तर कुणी ब्रह्मर्षिपद मिळवले. कुणी मोक्षप्राप्तीसाठी तपश्चर्या केली, तर कुणी ब्रह्मज्ञान मिळवले; पण या सर्व ऋषींमध्ये दोन ऋषींचे वेगळेपण विशेष जाणवते. एक महर्षि वाल्मीकि आणि दुसरे महर्षि व्यास !

वाल्मीकि ऋषि रामायणाची रचना करून अमर झाले, तर महर्षि व्यासांनी महाभारताची रचना केली आणि ते ग्रंथरूपाने चिरंजीव झाले. शेकडो वर्षे झाली, तरी या २ ग्रंथांचे महत्त्व न्यून झाले नाही. या २ ग्रंथांनी इतक्या वर्षांत कितीतरी लेखकांना लिहिण्याची प्रेरणा दिली. जवळजवळ प्रत्येक भारतीय माणूस व्यासांना ओळखतो, ते ‘महाभारतकार’ म्हणून !

१. व्यासांचा जन्म आणि बालपण

व्यास हे पराशर ऋषि आणि सत्यवती यांचे पुत्र. त्यांचा जन्म एका द्वीपात झाला अन् ते रंगाने काळे होते; म्हणून ‘कृष्ण द्वैपायन’ या नावाने ओळखले जाऊ लागले. कृष्ण द्वैपायन हळूहळू वाढू लागला. ८ वर्षांचा झाल्यावर त्याचे उपनयन झाले. त्याच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. सत्यवतीचे आपल्या मुलावर पुष्कळ प्रेम होते. तिला वाटत होते, मुलगा कायम आपल्या जवळ असावा. त्याने कुठे दूर जाऊ नये; पण पराशरांनी तिची समजूत घातली. ते म्हणाले, ‘‘ वेडे, हा मुलगा तुझ्याजवळच राहिला, तर तो विद्या कसा शिकणार ? ‘आपला मुलगा मोठा व्हावा, त्याने पुष्कळ विद्या मिळवावी, आपल्या बुद्धीने आणि ज्ञानाने लोकांचा आदर मिळवावा’, असे नाही वाटत का तुला ? तुझे त्याच्यावरचे प्रेम मी समजू शकतो. त्याला दूर करतांना तुला अनंत यातना होतील, याची मला कल्पना आहे; पण त्याला इलाज नाही. तुझे प्रेम त्याच्या प्रगतीच्या आड येता कामा नये. मी त्याला ब्रह्मदेवाकडे नेईन. तेथे तो सगळे काही शिकू शकेल. विद्याभ्यासाला निघालेल्या तुझ्या पुत्राला तू हसतमुखाने निरोप द्यायला हवा, अश्रूंनी नाही.’’

२. ब्रह्मदेवांकडे १४ विद्या आणि ६४ कलांचे ज्ञानार्जन अन् चारही वेदांवर मिळवलेले प्रभुत्व

पराशरांनी समजूत घातल्यावर सत्यवती मुलाला पाठवायला तयार झाली. पराशर त्याला घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी ब्रह्मदेवांना विनंती केली, ‘‘हे प्रभो, या मुलाला आपण शिकवावे, अशी प्रार्थना करायला मी आलो आहे. आपल्यासारखा श्रेष्ठ गुरु दुसरा कुणी नाही.’’ ब्रह्मदेवांनी मुलाकडे पाहिले. मुलगा बुद्धीमान आहे, हे त्यांनी ओळखले. ते म्हणाले, ‘‘मुलगा हुशार दिसतो आहे. मी त्याला शक्य ते सर्व शिकवीन. आपण त्याची काळजी करू नये.’’ ऋषि पराशर आनंदाने परतले.

मुलाचे शिक्षण चालू झाले. ब्रह्मदेव त्याला एकेक पाठ देऊ लागले. एकदा दिलेला पाठ परत देण्याची आवश्यकता त्यांना कधी वाटली नाही. शिकवलेले सर्व कृष्ण द्वैपायन भराभर ग्रहण करत होता. लवकरच त्याने १४ विद्या आणि ६४ कला आत्मसात केल्या. चारही वेदांवर प्रभुत्व मिळवले. शिकण्यासारखे होते ते सर्व शिकून झाले.

एके दिवशी ब्रह्मदेवांनी व्यासांना बोलावून म्हटले, ‘‘मुला, तुला जे शिकवण्यासारखे होते, ते मी शिकवले आहे. आता शिकायचे काही आहे, असे मला वाटत नाही. आता तुला निरोप घ्यायला हवा.’’ ‘‘जशी आपली इच्छा, गुरुदेव. मी आजच आपला निरोप घेतो. त्यापूर्वी एक प्रार्थना आहे, मनात ‘काहीतरी अलौकिक करून दाखवावे’, असे आहे. त्यासाठी आपले आशीर्वाद हवे आहेत.’’ त्यावर ब्रह्मदेवांची आशीर्वाद दिले.

३. महर्षि व्यासांची भ्रमंती

व्यासांनी गुरुदेवांना नमस्कार केला. गुरूंचा आशीर्वाद घेऊन व्यास निघाले. डोळ्यांपुढे विद्याभ्यासाच्या काळातील अनेक प्रसंग येत होते. मागचे सगळे दिसत होते. दिसत नव्हते ते पुढचे, पुढे काय ? हा मोठाच प्रश्न होता.

व्यासांना विवाहाची इच्छा झाली. जाबाली ऋषींच्या वटिका नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. त्या ऋषीकन्येचा सहवास व्यासांना आनंददायक वाटू लागला. वटिकेपासून त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव शुक्राचार्य.

त्यानंतर व्यासांनी प्रवास करण्याचे ठरवले. संपूर्ण भारतभर फिरण्यासाठी ते निघाले. प्रत्येक प्रदेशातील लोकांच्या रहाणीचे सूक्ष्म निरीक्षण ते करत होते. निरनिराळ्या प्रकारच्या माणसांच्या हृदयात डोकावत होते. त्यांची दुःखे ते समजून घेत होते. प्रदेश वेगळा, माणसे वेगळी, वातावरण वेगळे; पण दुःखे मात्र तीच. केवळ ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात असायची. या सगळ्या दुःखांचे स्वरूप व्यास समजून घेत होते. ही भ्रमंती ६ वर्षे चालली होती.

४. वेदांची ४ भागांत विभागणी करणारे ‘वेदव्यास’

६ वर्षानंतर व्यास हिमालयात गेले. तेथे त्यांनी एक साधा आश्रम उभारला. त्या निर्जन एकांत स्थळी व्यास आपला वेळ चिंतनात घालवू लागले. व्यासांचा वेदांचा अभ्यास मोठा होता. यज्ञ नीटपणे पूर्ण होण्यासाठी ४ अधिकार लागतात. ‘अध्वर्यू, होता, उद्गाता आणि ब्रह्मा या ४ अधिकार्‍यांना यज्ञातील आपला भाग नीटपणे पार पाडता यावा, यासाठी वेदांचे विभाग करावेत’, असे व्यासांना वाटले. त्या त्या अधिकार्‍याला आवश्यक असणारे मंत्र त्या त्या विभागात, असे करून ४ विभाग करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी मंत्रांची निवड केली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे वेदांचे ४ विभाग त्यांनी केले. यामुळे यज्ञ करणार्‍यांची पुष्कळच सोय झाली. व्यासांच्या या कार्यामुळे लोक त्यांना ‘वेदव्यास’ म्हणून ओळखू लागले.

५. व्यास विचारांना विद्याधिपती श्री गणेशाने पूर्णत्व देऊन घडलेला चिरंजीव ग्रंथ ‘महाभारत’ !

वेदांच्या वर्गीकरणानंतर व्यास पुन्हा आपला वेळ चिंतनात घालवू लागले. डोळ्यांसमोर पुन: पुन्हा भ्रमणकाल उभा रहात होता. अनेक प्रसंग डोळ्यांसमोर येत होते. सूक्ष्मपणे पाहून जे मनात साठले ते वर येत होते. बाहेर येण्यासाठी ते वाट शोधत होते. व्यासांनी हे सगळे लिहून काढण्याचा संकल्प केला. सगळी सिद्धता करून ते लिहिण्यास बसले. मनातील प्रसंग कागदावर उतरू लागले.

काही पाने लिहून झाली आणि मग जाणवले की, काहीतरी चुकते आहे. लेखणीपेक्षा मन फार वेगाने धावते आहे. लेखणी मनाच्या वेगाने धावू शकत नाही. तिचा वेग कमी पडतो आहे. लेखणीने जे लिहिले जात अाहे, त्यापेक्षा कितीतरी पुढचे मनात येत आहे. लेखणी मागे रेंगाळते आहे, मन पुढे धावते आहे. त्यामुळे गोंधळ उडतो आहे. आता या दोघांचा मेळ कसा घालावा ? व्यासांच्या पुढे मोठा प्रश्न पडला.

आता हा प्रश्न सोडवावा कसा ? व्यास विचार करू लागले. निरनिराळ्या देवांच्या मूर्ती त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या. कोण हा प्रश्न सोडवू शकेल बरे ? मग व्यासांच्या पुढे उभी राहिली श्री गणेशाची मूर्ती. संकटांचा नाश करणारा गणपति ! विद्यांचा अधिपति असणारा गणपति. व्यासांनी गणपतीला आवाहन केले. श्री गणेशाची मूर्ती डोळ्यांसमोर आणून गणेशाला आळवणे चालू केले. व्यासांची प्रार्थना ऐकून श्री गणेश त्यांच्यापुढे प्रकट झाले. व्यास आनंदले. ते म्हणाले, ‘‘गणेशा, माझ्यापुढे एक अडचण आहे, ती सोडवण्यासाठी मी आपणास बोलावले. मी एक ग्रंथ लिहावयास घेतला आहे. ग्रंथ जेवढा भरभर लिहिला जावा, तेवढा भरभर लिहिला जात नाही. तेव्हा एक प्रार्थना आहे, माझे लेखनिक म्हणून आपण काम करा.’’

श्री गणेश म्हणाले, ‘‘तुमची विनंती मला मान्य आहे; पण एक अट आहे. लिहायला एकदा आरंभ केल्यावर मी क्षणभरही थांबणार नाही. त्या गतीने तुम्हाला सांगावे लागेल.’’ व्यास म्हणाले, ‘‘हे गणाधिपते, मी सांगितलेल्या प्रत्येक श्लोकाचा नाद, अर्थ आणि सूचकता या गोष्टी आपल्या लक्षात आल्यावर आपण तो श्लोक लिहावा. ही अट जर आपल्याला मान्य असेल, तर आपली अट मला मान्य आहे.’’ श्री गणेशाने ‘तथास्तु’ म्हटले.

श्री गणेश लेखनसाहित्य घेऊन सिद्ध झाले. व्यास सांगू लागले. भराभर भूर्जपत्रावर विचार उतरू लागले. एक असामान्य ग्रंथ आकार घेऊ लागला. श्लोक सांगता सांगता मध्येच व्यास एखादा कूट प्रश्न उपस्थित करत. त्याचा अर्थ त्या विद्यांचा अधिपती असलेल्या गणरायालाही चटकन कळायचा नाही. लेखणी थांबायची. गणराय श्लोकाच्या अर्थाशी झुंज घेऊ लागायचे. तेवढ्या वेळात व्यास पुढील कथानक आपल्या डोक्यात सिद्ध करायचे. गणरायाला श्लोकाचा अर्थ उलगडला की, लेखन पुढे चालू होई. याप्रमाणे २ बुद्धीमंत या ग्रंथाच्या रचनेत मग्न झाले. एक चिरंजीव ग्रंथ हिमालयाच्या कुशीत निर्माण होत होता.

ग्रंथ पूर्ण झाला. व्यासांना समाधान लाभले. गणेशांनी लेखन पूर्ण केले, म्हणून व्यासांनी कृतज्ञता व्यक्त केली. श्री गणेशांनीही व्यासांच्या अगाध बुद्धीमत्तेबद्दल आदर व्यक्त केला. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. दोन महान विभूती काही दिवसांच्या मूल्यवान सहवासानंतर एकमेकांपासून दूर झाल्या, त्या एकमेकांविषयीचा आदर मनी ठेवूनच !

– शं. रा. देवळे (साभार : दीपावली अंक १९७५)