चर्चेनंतरच महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र ठरेल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सरकारमध्ये मतभेद नसल्याची स्पष्टोक्ती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

नागपूर – महायुतीमधील जागा वाटपावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. या चर्चेनंतरच ‘सत्ताधारी तिन्ही पक्षांतील जागावाटपाचे सूत्र ठरेल’, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी २७ नोव्हेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. राज्यात भाजप लोकसभेच्या २६ जागा, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळून २२ जागा देण्यात येणार असल्याची चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिले.

ते पुढे म्हणाले की,…

१. महायुती सरकारमध्ये मतभेद नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीत एकजूट आहे. राज्यात नेतृत्व पालटाचा कोणताही विचार नाही. मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मी माझ्याच विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीन.

२. अवेळी पडलेल्या पावसाच्या संदर्भात कुठे किती हानी झाली, याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्याचा सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकर्‍यांना साहाय्य करण्याची आहे.

३. राज्यघटनेचा मूळ गाभा कुणालाही पालटता येत नाही आणि हे कुणाच्या बापालाही शक्य नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे स्वत: बॅरिस्टर असल्याने ते त्यांनाही ठाऊक आहे; पण निवडणुका जवळ आल्यावर कुणाची राज्यघटना पालटण्याची, तर कुणाची मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा चालू होते.