कोयना धरण पाणी अडवणूक प्रकरणी प्रसंगी त्यागपत्र ! – संजयकाका पाटील, खासदार, भाजप

सांगली – सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी देण्यात येत नाही. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सांगलीला पाणी मिळत नाही. वास्तविक कोयना धरण कुणाच्या मालकीचे नाही. त्यामुळे अशा प्रकारे पाणी अडवणे अत्यंत चुकीचे आहे. सांगलीच्या अधिकाराचे पाणी मिळण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. यातूनही जर समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर कोयना धरण पाणी अडवणूकप्रकरणी प्रसंगी त्यागपत्र देऊ, अशी चेतावणी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी दिली. ते सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

खासदार संजयकाका पाटील पुढे म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी पाऊस न्यून झाल्याने कृष्णा नदी दुसर्‍यांदा कोरडी पडली आहे. सांगलीत कोयनेच्या पाणी प्रश्नावरून कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत काही ठराव करण्यात आले. त्या ठरावावर सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी स्वाक्षरी केली; मात्र सातार्‍याच्या पालकमंत्र्यांनी आडमुठी भूमिका घेत त्यावर स्वाक्षरी केली नाही. या संदर्भात पाटबंधारे विभागाचे अधिकारी त्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना दमबाजी करण्यात आली. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागत आहोत. सातार्‍याच्या पालकमंत्र्यांनी आडमुठी भूमिका घेतली याचा आम्ही निषेध करत आहोत.’’ कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी २ ‘टी.एम्.सी.’ पाणी २४ नोव्हेंबरला रात्री सोडण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.