नवी मुंबई, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील बांधकाम व्यावसायिकांच्या बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई (बी.ए.एन्.एम्.) आणि कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) यांच्या वतीने मालमत्ता प्रदर्शन वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये आयोजित करण्यात आले आहे. १ ते ४ डिसेंबर या कालावधीत हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, अशी माहिती बी.ए.एन्.एम्.चे अध्यक्ष वसंत भद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बी.ए.एन्.एम्.चे सचिव जिगर त्रिवेदी, भूपेंद्र शहा, शैलेश पटेल (संयोजक) आदी उपस्थित होते.
निर्माणाधीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नगरीत हक्काची घरे देण्याचा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. नवी मुंबई, पनवेल, उलवे, खोपोली, कर्जत परिसरातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती या मालमत्ता प्रदर्शनातून करता येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर करणार आहेत. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अन्य मान्यवर या वेळी उपस्थित असणार आहेत.
खारघर, खोपोली, कर्जत, तळोजा, पुष्पकनगर, द्रोणागिरी, उरण, उलवे, पामबीच, एन्.आर्.आय., सानपाडा, वाशी आदी ठिकाणी गृहप्रकल्प निर्माण करत असलेल्या शेकडो विकासकांचे २५० प्रकल्प या प्रदर्शनात असणार आहेत.