पुणे – हडपसर विधानसभा मतदारसंघातील ‘महंमदवाडी’ या उपनगराचे नाव ‘महादेववाडी’ करण्याच्या हालचाली शिवसेना गटाकडून चालू झाल्या आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राज्यातील पालटत्या सत्तासमीकरणात ‘या विधानसभा मतदारसंघातील ‘महंमदवाडी’ या उपनगराचे नाव ‘महादेववाडी’ करावे’, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे आणि रायगडचे शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी आमदार गोगावले यांच्याकडे ही मागणी केली होती. त्यानुसार गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात महापालिकेकडे अभिप्राय मागवण्यात आला आहे.
हडपसर परिसरातील हंडेवाडी येथे प्रभु श्रीराम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला राज्याच्या नगरविकास विभागानेही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. हा प्रस्तावही शिवसेनेचे तत्कालिन नगरसेवक विद्यमान शहरप्रमुख नाना भानगिरे यांनीच महापालिका प्रशासनास दिला होता.