छत्रपती संभाजीनगर – भाविकांसाठीच्या सेवा-सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवस्थापनातील सुसूत्रता यासाठी ‘टेंपल कनेक्ट संस्थे’च्या वतीने चालू करण्यात आलेल्या ‘स्मार्ट टेंपल मिशन’मध्ये राज्यातील ७ मंदिरे देशात अव्वल ठरत आहेत. यात जगभरातील ५७ देशांतील ९ सहस्र ८६४ मंदिरांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात श्रीक्षेत्र पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, नागपूरचे इस्कॉन मंदिर, अमरावतीचे श्री अंबिकादेवी मंदिर, बीडचे राक्षसभुवन मंदिर आणि औंढा नागनाथचे नागेश्वर मंदिर भाविकांना देण्यात येणार्या सेवा-सुविधा आणि प्रभावी व्यवस्थापन यांमुळे ‘स्मार्ट टेंपल’ ठरली आहेत. देशात ३०-३२ लाख मंदिरे असून काही कोटींच्या संख्येने भाविक तेथे दर्शनासाठी प्रतिदिन जात असतात. त्यांच्या सोयीसाठी मंदिरांच्या व्यवस्थापनात आधुनिकता आणण्याच्या उद्देशाने पुणे येथील गिरीश कुलकर्णी यांनी वर्ष २००७ मध्ये ‘स्मार्ट टेंपल मिशन’ या मोहिमेला मंदिरांच्या व्यवस्थापकांशी बोलून प्रारंभ केला. याचे लाभ दिसू लागल्यावर अनेक मंदिरे या मोहिमेत सहभागी झाली.
धार्मिक पर्यटनास चालना देण्याची भूमिका ! – गिरीश कुलकर्णी, संयोजक, टेंपल कनेक्ट
जगभरातील मंदिरे या ‘स्मार्ट टेंपल मिशन’मध्ये जोडली जात आहेत. मंदिरांचे व्यवस्थापन भाविकांसाठी सुकर व्हावे आणि धार्मिक पर्यटनास चालना मिळावी, या उद्देशाने हे चालू करण्यात आले. यात मराठवाडा आणि विदर्भ येथील मंदिरे झपाट्याने ‘स्मार्ट’ होत आहेत. यासह मंदिरे एकमेकांना जोडलेली असल्याने त्यांच्यातील परस्पर समन्वय आणि संवाद यांचा त्यांना लाभ होत आहे.
काय आहे टेंपल मिशन ?
मिशन अंतर्गत दर्शन व्यवस्था, प्रसादालये, ऑनलाईन बुकिंग, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म, वाहनतळ, पाण्याची व्यवस्था, निवास व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, कामकाज, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छतागृहे, सुविधा कक्ष, निधी कक्ष या सर्वांमध्ये आधुनिकता आणली जात आहे.