हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या अनुषंगाने धर्माचरण आणि साधना यांचे महत्त्व !

१. साधकांचे जीवन धर्माधिष्ठित हवे !

‘सर्वांचे कल्याण करणारे परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) नेहमी सांगतात, ‘‘आपले हिंदु राष्ट्र येणार आहे आणि ही ईश्वराचीच इच्छा आहे.’’ आपले कल्याण करणार्‍या इष्ट देवतेचीही हीच इच्छा आहे; परंतु हिंदु राष्ट्राचा विचार आणि संकल्पना नक्की कशी असली पाहिजे ? सर्वांत प्रथम आपले साधकांचे जीवन धर्माधिष्ठित असले पाहिजे. आपल्याला ‘आपल्या राष्ट्राची खरेच प्रगती व्हावी’, असे वाटत असेल, तर ‘सर्वप्रथम आपण सर्वांनी हिंदु धर्माचे संस्कार आपल्यावर कसे होतील ?’, हे बघायला हवे.

२. हिंदु धर्माच्या संस्कारांचा अभाव !

मी एक ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र, कर्नाटक आदी पुष्कळ ठिकाणी जात असतो. तेव्हा मला लोकांच्या घरात हिंदु धर्माच्या संस्कारांचा तीव्र अभाव दिसून येतो. सर्वांत प्रथम आपले ‘मातृदेवो भव ।’, ‘पितृदेवो भव ।’ म्हणजे आपल्या घरातील वयस्कर लोकांचा आदर करावा. बाहेरून आलेल्या अतिथींचे सन्मानपूर्वक आदरातिथ्य केले पाहिजे.

३. सात्त्विक हिंदु राष्ट्रात कोणताही भ्रष्टाचार नसेल !

श्री. प्रसाद पंडित

गुरुजींनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) मार्गदर्शन केल्यानुसार सर्वप्रथम आपल्याला आपल्या साधनेचा स्तर वाढवला पाहिजे. आपल्यामध्ये असलेले सद्गुण आपण हिंदु राष्ट्रात पुढे घेऊन जाऊ शकतो. आपल्याला सात्त्विक हिंदु राष्ट्र आणायचे आहे. सात्त्विक हिंदु राष्ट्रात कोणताही भ्रष्टाचार नसेल, तसेच कुणीही चुकीचे कार्य करत नसेल. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपली साधना वाढवली पाहिजे.

४. हिंदु राष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आपण काय करावे ?

मी ज्योतिषी असून वास्तुशास्त्राच्या क्षेत्रात कार्यरत आहे. माझ्यासारखे पुष्कळ लोक आहेत की, ज्यांना साधनेची योग्य पद्धत ठाऊक नाही. आपल्या उपासनेत सर्वांत प्रथम आपले कुलधर्म-कुलाचार पाळायला पाहिजेत. आपल्या पूर्वजांचे श्राद्धविधी करायला पाहिजेत. वर्षातून किमान एकदा आपल्या इष्टदेवतेचे दर्शन घेण्यासाठी गेले पाहिजे. तेथे जाऊन तिची आराधना करायला पाहिजे. आपले संत, सद्गुरु, गुरुपरंपरा यांना पुनर्जीवित करायला पाहिजे. त्यांच्यामुळेच आणि तेथूनच आपले हिंदु राष्ट्र पुढे जाऊ शकणार आहे. हीच माझी विचारसरणी आहे.’

–  श्री. प्रसाद पंडित, अध्यक्ष, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर.

हिंदु राष्ट्राचा प्रारंभ आपल्या घरापासून करण्यासाठी ‘सनातन आश्रमां’चा आदर्श घ्या !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

आपण ‘हिंदु राष्ट्रा’विषयी केवळ चर्चा करतो; परंतु हिंदु राष्ट्र आणण्यासाठी आपले घर, कुटुंब, बहीणभावंडे, आई-वडील, नातेवाईक या सर्वांनी ‘सनातन आश्रमा’चे दर्शन घेतले पाहिजे. आश्रमात पुष्कळ चांगले संस्कार आहेत. आश्रमातील भगिनींचे रहाणीमान, सर्वांकडून व्यक्त होणारा नम्रताभाव, कुणी कुणावर रागावत नाही, सर्वजण आपले एक ‘कुटुंब’ म्हणून एकोप्याने रहातात. आपले ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे ब्रीदवाक्य यातूनच येते. अशी व्यवस्था आपण आपल्या घरी प्रथम निर्माण केली पाहिजे. घरोघरी असे झाल्यानंतरच आपण आपले ‘हिंदु राष्ट्र’ पुढे घेऊन जाऊ शकतो. येथील आश्रमदर्शनाची व्यवस्था आहे, तसेच येथे वैज्ञानिक दृष्टीकोनातून अध्यात्म सांगितले जाते. या गोष्टी पुढे नेल्या पाहिजेत.

– श्री. प्रसाद पंडित, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर.