पुणे – येथील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव हा पळून गेला आहे. आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका हत्येच्या गुन्ह्यात वर्ष २००८ पासून येरवडा कारागृहात होता. जाधवला येरवडा कारागृहातील ‘रेशन विभागा’त काम देण्यात आले होते. या कामाच्या वेळीच तो पळून गेल्याचा संशय आहे. पोलिसांना चकवा देऊन तो कारागृहातून पळून गेल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (कारागृहासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणच्या सुरक्षेत ढिसाळपणा करणार्यांवर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)
२० नोव्हेंबर या दिवशी कारागृहातील बंदीवानांची तुरुंग अधिकार्यांनी मोजणी केली. त्या वेळेस अशिष जाधव हा कारागृहातील अधिकार्यांना आढळला नाही. राज्यातील सर्वांत संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणार्या येरवडा कारागृहातूनच तो पसार झाला आहे.
संपादकीय भूमिका :कारागृहातील गुंडांनाही सांभाळू न शकणारे पोलीस राज्याची कायदा-सुव्यवस्था काय सांभाळणार ? |