१. नामजपापेक्षा समष्टी सेवेला अधिक महत्त्व असल्याने सेवा करतांना ईश्वराचे स्मरण अधिक होते !
आधुनिक वैद्या (सौ.) संगीता चौधरी : गुरुदेव, मी आता उपाय म्हणून ३ – ४ घंटे नामजप करण्यासाठी बसते; परंतु जेवढे मला सेवेतून ईश्वराच्या अनुसंधानात रहाता येते, तेवढे माझ्याकडून नामजप करतांना ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे किंवा ईश्वराला अनुभवणे होत नाही. सेवा करतांना मला ईश्वराचे स्मरण अधिक होते आणि ‘सेवेच्या माध्यमातून अधिक आध्यात्मिक लाभ होतात’, असेही जाणवते. ही प्रक्रिया कशी असते ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘नाम, सत्संग आणि सत्सेवा…’, असे साधनेचे टप्पे आहेत. सेवा ही पुढची पायरी आहे. नवीन साधकांना ‘नामजप करा’, असे सांगितले जाते. समष्टी सेवा केल्याने कितीतरी अधिक पटींनी लाभ होतात, उदा. समजा, व्यष्टी साधनेमुळे २५ टक्के लाभ होत असेल, तर समष्टी साधनेने ७५ टक्के लाभ होतो. त्यामुळे अशी अनुभूती येते.
२. साधकाने आश्रमात १२ वर्षे शारीरिक सेवा केल्यामुळे त्याच्या साधनेचा पाया बळकट झाला !
श्री. ज्ञानेश्वर गावडे : मला आश्रमात येऊन १२ वर्षे झाली; परंतु मला वाटते, ‘माझ्यामध्ये अजून काहीच पालट झाले नाहीत.’ माझ्या मनात विचार येत रहातात आणि माझ्याकडून साधनेचे प्रयत्न अंतर्मुखतेने होत नाहीत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : १२ वर्षे आश्रमात राहिला आहेस. ‘येथून घरी जावे आणि नोकरी किंवा उद्योगधंदा करावा’, असे विचार तुझ्या मनात अधूनमधून येतात का ?
श्री. ज्ञानेश्वर गावडे : तसे विचार माझ्या मनात आले नाहीत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आश्रमात राहून बांधकामाशी संबंधित सेवा करतोस. त्यामुळे तुझी शरिराची साधना झाली. तू शरीर अर्पण केलेस आणि शरिराचा त्याग केलास. त्यानंतर मनाचा त्याग होण्यासाठी अखंड नामजप व्हावा लागतो. त्यासाठी मनाला स्वयंसूचना द्यायच्या असतात. हा पुढचा टप्पा आहे. ते १ – २ वर्षांत होऊ लागेल. तन, मन आणि बुद्धी आणि त्यानंतर चित्त अन् अंतर्मन ! टप्प्याटप्याने पुढे जायचे. अखंड नामजप आणि अखंड सेवा केलीस की, तुझी आध्यात्मिक प्रगती होईल. तू १२ वर्षे शरिराने सेवा केलीस, ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ‘साधनेचा पाया पक्का झाला’, असे समज ! मुळीच चिंता करू नकोस. लवकर पुढे जाशील. आणखी काय हवे ?
श्री. ज्ञानेश्वर गावडे : काही नाही गुरुदेव !
परात्पर गुरु डॉ. आठवले : चांगले आहे !
३. संतसेवा करतांना संत जे सांगतात, त्याचे आज्ञापालन करणे महत्त्वाचे असते !
कु. गुलाबी धुरी : कधी कधी पू. आजी (सनातन संस्थेच्या ८६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकरआजी) ध्यानावस्थेत असतात. जेव्हा त्यांना जेवण भरवायचे असते, तेव्हा मी त्यांना सांगते, ‘‘हे सगळे आपल्याला संपवायचे आहे.’’ कधी कधी त्या तोंड उघडतात. मी त्यांच्या तोंडात घास घालते; परंतु त्या खात नाहीत. त्या वेळी ‘काय करावे ?’, असा प्रश्न मला पडतो. त्यांना असे पुनःपुन्हा सांगावे लागते. त्यांची स्थिती मला सांगता येत नाही. त्या वेळी मी कसे करायला पाहिजे ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : त्या संत आहेत ना ! त्यांनी म्हटले, ‘भोजन करायचे नाही’, तर त्यांना जेवण द्यायचे नाही.
कु. गुलाबी धुरी : मी एकदा असे केले होते. त्यांना भोजन करायचे नव्हते. मी विचार केला, ‘त्यांना झोपायचे आहे, तर झोपू द्यावे.’ तेव्हा त्या झोपल्या.
परात्पर गुरु डॉ. आठवले : योग्य आहे. संत ध्यानाच्या स्थितीत असतील, तर त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करू नये. एकदा हात लावून त्यांना विचारायचे, ‘‘पू. आजी, जेवण करणार का ?’’ त्यांनी काही उत्तर दिले नाही, तर सोडून द्यायचे. काही घंट्यांनंतर पुन्हा विचारायचे.’
(सप्टेंबर २०२०)