शिंदे गटाने कागदपत्र सादर करण्‍यासाठी मुदत वाढवून मागितली !

शिवसेनेच्‍या आमदारांच्‍या पात्रतेविषयीची सुनावणी !

मुंबई – शिवसेनेच्‍या आमदारांच्‍या पात्रतेविषयी २१ नोव्‍हेंबर या दिवशी विधानसभेचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता राहुल नार्वेकर यांच्‍यापुढे विधानसभेत सुनावणी झाली. या वेळी एकनाथ शिंदे यांच्‍या गटाकडून कागदपत्रे सादर करण्‍याची मुदत वाढवून मागितली. अध्‍यक्षांनी त्‍यांना २४ नोव्‍हेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्‍या गटाकडून कागदपत्रे जमा केली. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभु यांची साक्ष नोंदवून घेण्‍यात आली. शिंदे गटाकडून अधिवक्‍ता महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाकडून अधिवक्‍ता देवदत्त कामत यांनी अध्‍यक्षांपुढे बाजू मांडली. सुनावणीच्‍या वेळी दोन्‍ही अधिवक्‍त्‍यांनी एकमेकांवर वैयक्‍तिक टीकाटिपणी केली. याविषयी अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी अप्रसन्‍नता व्‍यक्‍त केली. शिवसेनेच्‍या उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्‍या आमदारांना अपात्र करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका करण्‍यात आली होती. दोन्‍ही गटांकडून एकमेकांच्‍या विरोधात याचिका केल्‍या होत्‍या. या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने विधानसभा अध्‍यक्षांपुढे सुनावणी घेण्‍याचा आदेश दिला आहे. त्‍यानुसार ही सुनावणी चालू आहे.