दिवाळीत पुणे येथील ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ बससेवेला ९ कोटी रुपयांचे उत्‍पन्‍न !

पुणे – ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्‍या (पी.एम्.पी.एम्.एल्.) दिवाळीमध्‍ये उत्‍पन्‍नामध्‍ये ९ कोटी ६ लाख रुपयांची भर पडली आहे. मागील २ वर्षांच्‍या तुलनेत अनुमाने ३ कोटी रुपयांची वाढ झाली असल्‍याचे दिसून येत आहे. वर्ष २०२१ मध्‍ये ५ कोटी ३४ लाख रुपये, तर वर्ष २०२२ मध्‍ये ६ कोटी ३५ लाखाहून अधिक उत्‍पन्‍न मिळाले होते. ९ ते १५ नोव्‍हेंबर या कालावधीमध्‍ये हे उत्‍पन्‍न मिळाले आहे. दिवाळी सणामध्‍ये गर्दीच्‍या मार्गांवर अधिकच्‍या (जादा) गाड्यांचे नियोजन केले होते. दिवाळीच्‍या ७ दिवसांमध्‍ये ‘वसुबारस’ला १ कोटी ५६ लाख रुपये, तर ‘भाऊबिजे’च्‍या दिवशी १ कोटी ३९ लाख ६८ सहस्र रुपयांचे उत्‍पन्‍न मिळाले. ‘लक्ष्मीपूजना’दिवशी सर्वांत अल्‍प ९१ लाख रुपये उत्‍पन्‍न मिळाल्‍याचे पी.एम्.पी.एम्.एल्.कडून सांगण्‍यात आले आहे.