कोल्हापूर – शासनाचे कर लेखापरीक्षण आणि ऊस दर निश्चितीचे नियम पहाता साखर कारखान्यांची मागील हंगामातील कोणतीही देय रक्कम थकित नाही, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कोल्हापूर येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी कळवली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी हे गतवर्षीच्या ज्या ४०० रुपयांच्या संदर्भात साखर कारखान्यांकडे वारंवार मागणी करत आहेत, त्यातील कोणतीही रक्कम साखर कारखान्यांकडून शेतकर्यांना मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक यांनी म्हटले आहे की,
१. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक यांच्यासमवेत, तसेच जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना यांच्या समवेत शेतकर्यांना दिले जाणारे दर या संदर्भात १६ नोव्हेंबर या दिवशी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे साखर कारखान्यांचे ६ प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे ६ प्रतिनिधी यांची समिती सिद्ध करण्यात आली.
२. स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याकडून ६ शेतकरी प्रतिनिधी यांची नावे देण्यात आली नाहीत. या समितीला २१ नोव्हेंबरपूर्वी मागील हंगामातील काही अतिरिक्त रक्कम देता येईल का ? याची पडताळणी करून अहवाल द्यायचा होता.
३. या संदर्भात शेतकरी संघटनेने केलेल्या मागणीप्रमाणे साखर कारखान्यांचा अभ्यास केला असता ऊस दर परिगणतेनुसार शेतकर्यांना देता येईल, अशी कोणतीही अतिरिक्त रक्कम दिसून येत नाही. तरी शेतकरी संघटनांनी त्यांचे आंदोलन मागे घेऊन चालू हंगाम लवकरात लवकर चालू करून सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि सर्व कारखानदार यांनी केले आहे.