वनांची औद्योगिक उपयोगिता वाढवण्‍यासाठी राज्‍यात औद्योगिक विकास महामंडळ स्‍थापन होणार !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – वनांवर आधारित व्‍यवसाय वाढण्‍यासाठी राज्‍यात ‘महाराष्‍ट्र वन औद्योगिक विकास महामंडळ (एम्.एफ्.आय्.डी.सी.)’ स्‍थापन करण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने घेतला आहे. फर्निचर, अन्‍य उत्‍पादने, वनौषधी आदी उपयोगिता वाढवण्‍यासाठी हे महामंडळ काम करणार आहे.

महाराष्‍ट्रातील एकूण भूमीपैकी २० टक्‍के म्‍हणजे ६१ सहस्र ९०७ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. वनाच्‍या माध्‍यमातून उपजीविकेची साधने निर्माण होत आहेत. राज्‍यात वनांपासून विविध ३३ उत्‍पादने घेतली जात आहेत. वनांची उत्‍पादकता वाढवण्‍याच्‍या दृष्‍टीने अभ्‍यास करण्‍यासाठी शासन प्रायोगिक तत्त्वावर समिती स्‍थापन करणार आहे. नागपूर क्षेत्रामध्‍ये ‘फर्निचर’चा, तर चंद्रपूर क्षेत्रामध्‍ये वनौषधीविषयीचा विस्‍तृत अभ्‍यास करून याविषयीचा आराखडा सिद्ध करण्‍यात येणार आहे. उत्‍पादनांची ऑनलाईन विक्री करण्‍यासाठीही, तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग करण्‍यासाठी आवश्‍यकता असल्‍यास आराखडा सिद्ध करण्‍याचा निर्णय शासनाने घेतला आहे.