पुणे – सार्वजनिक धर्मादाय न्यासांतर्गत नोंद असलेल्या आणि वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा अधिक व्यय असलेल्या रुग्णालयांनी गरीब रुग्णांना सवलतीच्या दराने अन् निर्धन रुग्णांस विनामूल्य आरोग्य उपचार द्यावेत. ‘या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल. अशा रुग्णालयांच्या अन्य सवलती, लाभ काढून घेण्यासाठी शासनाकडे धर्मादाय कार्यालय विनंती करील’, अशी चेतावणी धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी दिली आहे. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? – संपादक)
ते म्हणाले की, ‘धर्मादाय’ अशी नोंद असलेल्या रुग्णालयांनी एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी विनामूल्य उपचारांकरता आणि १० टक्के खाटा दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी सवलतीच्या दराने उपचारांकरता आरक्षित ठेवाव्यात. रुग्णाचे उपचार नाकारल्यास संबंधितांनी धर्मादाय कार्यालयातील रुग्णालय अधीक्षक आणि निरीक्षक यांच्याकडे तक्रार करावी. तातडीच्या वेळी धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णास त्वरित भरती करावे. आवश्यकता वाटल्यास पुढील उपचारांसाठी रुग्णास सार्वजनिक रुग्णालयात नेण्यासाठी वाहतुकीची सुविधा पुरवावी. तातडीचे रुग्ण म्हणून भरती करून घेतांना धर्मादाय रुग्णालयांनी कोणतीही अनामत रक्कम मागू नये.