मुंबई, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा काढला, ती वाघनखे लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ या वस्तूसंग्रहालयात आहेत. इंग्लंडसमवेत सामंजस्य करार करून महाराष्ट्र शासनाकडून १६ नोव्हेंबर या दिवशी ही वाघनखे मुंबईत आणली जाणार होती. महाराष्ट्र शासनाने याविषयी ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ वस्तूसंग्रहालयासमवेत करारही केला; मात्र इंग्लंडच्या मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली नसल्यामुळे ही प्रक्रिया रखडली आहे. इंग्लंडच्या मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतरच वाघनखे भारतात आणता येणार आहेत, अशी माहिती राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.
‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ वस्तूसंग्रहालयाकडून ३ वर्षांच्या करारावर ही वाघनखे महाराष्ट्र शासनाकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत. वाघनखे संग्रहालयात एकाच ठिकाणी ठेवण्याची अटही घालण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: इंग्लंड येथे जाऊन याविषयीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे; मात्र आता इंग्लंडच्या मंत्रीमंडळाची मान्यतेनंतरच वाघनखे भारताकडे सुपुर्द करण्याची प्रक्रिया होणार आहे.