मंगळसूत्र आणि जोडवी यांना अनुमती !
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि चेहरा झाकण्याचे वस्त्र)
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील ‘कर्नाटक परीक्षा प्राधिकरणा’ने परीक्षेच्या वेळी हिजाब घालून येण्यावर बंदी घातली आहे. यात थेट हिजाब शब्दाचा वापर करण्यात आला नसला, तरी ‘डोके झाकणारे वस्त्र वापरण्यात येऊ नये’, असे म्हटले आहे. याच वेळी दागिने घालण्यावरही बंदी आहे. यात केवळ मंगळसूत्र आणि जोडवी घालून येण्यास अनुमती देण्यात आली आहे. याखेरीज फोन ब्ल्यूटुथ, इअरफोन आदी इलेक्टॉनिक वस्तू समवेत ठेवण्यासही बंदी घातली आहे. कपड्यांच्या संदर्भातही नियम करण्यात आला आहे. तरुणींना उंच सँडल्स, जीन्स आणि टी शर्ट घालून येण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. येत्या १८ आणि १९ नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहेत. यापूर्वी गेल्या मासात अशाच प्रकारच्या परीक्षेमध्ये हिंदु विवाहित महिलांना परीक्षेच्या वेळी मंगळसूत्रासह सर्व दागिने काढण्यास सांगण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर हे नियम आता लागू करण्यात आले आहेत. यामागे कॉपी करण्यात येऊ नये, हा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
(म्हणे) ‘मुसलमानांना लक्ष्य करून बंदी घालण्यात आली !’ – ओमर अब्दुल्ला यांची टीका !
कुणी काय घालावे आणि घालू नये, यामध्ये सरकार हस्तक्षेप का करत आहे ? मुसलमानांना लक्ष्य करून ही बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये असे होत आहे. कर्नाटकमध्ये पूर्वी भाजपचे सरकार असतांना असेच घडत होते आणि आता काँग्रेसचे सरकार असतांनाही तेच घडत आहे. काँग्रेस सरकारकडून असे आदेश दिले जाणे निराशजनक आहे. मी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना यावर विचार करण्यास आणि आदेश मागे घेण्यास सांगत आहे.
संपादकीय भूमिकाहिजाब घालून येतांना कुणी कॉपीचे कागद त्यात लपवले, तर ते कळणार कसे ? |