सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍पाकरता ५३० कोटी रुपयांचे कर्ज कशासाठी ? – सजग नागरिक मंच

पुणे – महापालिकेच्‍या विविध अधिकोषांमध्‍ये २ सहस्र २०० कोटी रुपये, तर सरकारी सुरक्षितता (गव्‍हर्नमेंट सिक्‍युरिटीज्) म्‍हणून ७५५ कोटी रुपये गुंतवलेले आहेत. असे असतांना शहरामध्‍ये राबवण्‍यात येणार्‍या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍पाकरता ५३० कोटी रुपयांचे कर्ज घेण्‍याचे कारण काय ? अधिकोषांकडून अधिक व्‍याजदराचे कर्ज घेऊन पुणेकरांची आर्थिक हानी करू नये, अशी मागणी ‘सजग नागरिक मंचा’ने आयुक्‍त विक्रम कुमार यांच्‍याकडे केली आहे.

महापालिकेने २३ गावांतील सांडपाणी व्‍यवस्‍थापनासाठी १ सहस्र ३८४ कोटी रुपयांचा आराखडा सिद्ध केला आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यात ५३० कोटी रुपयांचे काम होणार असून त्‍यासाठी कर्ज काढण्‍यात येणार आहे. या संदर्भात ‘सजग नागरिक मंचा’चे अध्‍यक्ष विवेक वेलणकर यांनी वरील प्रश्‍न उपस्‍थित केला आहे.

अधिकोषांचे व्‍याजदर अधिक असतात. त्‍यामुळे मोठी रक्‍कम ही व्‍याज भरण्‍यामध्‍ये जाईल. कर्ज काढायचे असेल, तर अधिकोषांमध्‍ये ठेवलेल्‍या ठेवींच्‍या व्‍याजदरापेक्षा अल्‍प व्‍याजदराने कर्ज घ्‍यावे, असा सल्लाही वेलणकर यांनी दिला आहे.

संपादकीय भूमिका

अधिक व्‍याजदराचे कर्ज काढणे म्‍हणजे नागरिकांनी ‘करा’पोटी भरलेल्‍या पैशांचा अपव्‍यय नाही का ? असे करण्‍यामागचे कारण पुणे महापालिका प्रशासन स्‍पष्‍ट करील का ?