मुंबई विद्यापिठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक !
मुंबई – मुंबई विद्यापिठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीसाठी यापूर्वी झालेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेत पुष्कळ प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. त्यांची विशेष तपास पथकाद्वारे (‘एस्.आय.टी.’द्वारे) चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.
मुंबई विद्यापिठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक एप्रिल २०२४ अखेरीस होणार आहे. त्यासाठी नव्याने मतदार नोंदणी प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये विविध विद्यार्थी संघटना सक्रीययपणे सहभागी झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी यापूर्वी झालेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेत काही ठराविक ‘आय.पी. अड्रेस’वरूनच पुष्कळ प्रमाणात मतदार नोंदणी करण्यात आली आहे, तसेच काही ठराविक बँकांच्या खात्यातून मतदार नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. मतदारांचा भ्रमणभाष क्रमांक आणि ई-मेल आयडीही वगळण्यात आला आहे. प्रारंभी असलेली ‘ओ.टी.पी.’ची पद्धतही बंद करण्यात आली. दुबार नोंदणीही करण्यात आली आहे. हे सर्व गैरप्रकार एका विशिष्ट संघटनेच्या लाभासाठी करण्यात आल्याचा आरोप डॉ. मनीषा कायंदे यांनी या पत्रात केला आहे. याविषयी मुंबई विद्यापिठाच्या कुलगुरूंकडे पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याचे कायंदे यांनी म्हटले आहे.