आज सरकारचे शिष्टमंडळ मराठा आरक्षणाच्या समयमर्यादेविषयी पुन्हा जरांगे यांची भेट घेणार !

आंदोलनकर्ते मनोज जरांगे करणार महाराष्ट्राचा दौरा !

छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. ६ किंवा ७ नोव्हेंबर या दिवशी ते याविषयीची घोषणा करणार आहेत. याशिवाय ‘सरकारचे शिष्टमंडळ ६ नोव्हेंबर या दिवशी रुग्णालयात येऊन माझी पुन्हा भेट घेणार आहेत. या वेळी मराठा आरक्षणाची समयमर्यादा कोणती असावी ? याविषयी शिष्टमंडळ चर्चा करणार आहे’, अशी माहिती मनोज जरांगे यांनी ५ नोव्हेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार चालू आहेत. ते म्हणाले की, माझी प्रकृती आता चांगली आहे. कुणीही काळजी करू नये; मात्र आता आरक्षण मिळाल्याविना आपण शांत बसणार नाही. आतापर्यंत मराठा समाजावर पुष्कळ अन्याय झाला आहे. आता चांगले दिवस आले आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन चालूच रहाणार आहे.

१ डिसेंबरपासून साखळी उपोषण !

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, मी पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. या दौर्‍यात आतापर्यंत राहिलेल्या भागांत जाणार असून मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहे. त्यांना मराठा आरक्षणामागची स्वतःची भूमिका समजावून सांगणार आहे, तसेच पुढील लढाई अधिक जोमाने लढण्यासाठी त्यांना सिद्ध करणार आहे. मराठा आरक्षण आणि आंदोलन यांची धग तेवत ठेवण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात १ डिसेंबरपासून ‘साखळी उपोषण’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुणीही आत्महत्या करू नका. पुढील आंदोलनात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडू नयेत.