दिवाळीमध्ये वाहतुकीचे नियम शिथिल करा ! – ठाकरे गटाची पोलीस प्रशासनाकडे मागणी

वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांना निवेदन देताना ठाकरे गटाचे पदाधिकारी

सातारा, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – सातारा शहरात वाहनतळाचा प्रश्‍न नेहमीचाच आहे. मुख्य बाजारपेठेत दुकानदारांसमोर गाड्या लावता येत नाहीत. दिवाळीला खरेदी करण्यासाठी सातारावासीय गेल्यावर त्यांच्या वाहनांना जागा नसते. वाहतूक शाखा त्या वाहनांवर कारवाई करते. दिवाळीचा सण जवळ आलेला आहे. वाहतूक शाखेने सातारावासियांना वाहतूक नियमांमध्ये थोडी सवलत देऊन नियम शिथिल करावेत, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन सातारा शहर वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांच्याकडे देेण्यात आले आहेत.

निवेदनात म्हटले आहे, महागाईच्या काळात जी.एस्.टी. आणि ऑनलाईन व्यापार्‍याच्या विळख्यात व्यापारी अडकला आहे, तसेच ऑनलाईन पद्धतीने सर्वच स्तरातील जनतेची फसवणूक होत आहे. शहरी भागासमवेतच शेजारील तालुक्यातून दिवाळीनिमित्त शेतकरी आणि गावाकडील मोलमजुरी करणारा वर्ग शहरात खरेदीसाठी येतो. या कालावधीत दुकानांसमोर मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहने लावण्यासाठी जागा अल्प पडते. परिणामतः ग्राहकांना दूर अंतरावर वाहने लावावी लागतात. या सर्व गोष्टींचा सकारात्मक विचार करून सातारा वाहतूक शाखेने सामंजस्याची भूमिका घ्यावी. दिवाळीच्या कालावधीमध्ये ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई करू नये, तसेच याविषयी आपल्या कर्मचार्‍यांना योग्य ते मार्गदर्शन करून आदेश द्यावेत.