मूलभूत नागरी सुविधांसाठी नागरिकांना आंदोलन का करावे लागते ?
पुणे – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील गोखलेनगर, जनवाडी, जनता वसाहत आदी परिसरात नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटले आहेत; तर अनेक स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत. ‘ड्रेनेज’मधून निघणारे दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात जाते, तर अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग साचले असून डासांचे प्रमाणही वाढले आहे. या सर्व समस्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी देऊनही प्रशासनाने त्याची नोंद न घेतल्याने स्थानिक रहिवाशांनी शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रवीण डोंगरे यांनी आंदोलनाचे नियोजन केले होते. वस्ती पातळीवर जुन्या ‘ड्रेनेज लाईन’ असल्याने त्या खराब झाल्या आहेत. ज्या ठिकाणी समस्या आहेत, तेथे जाऊन पहाणी करून कामे केली जातील, असे शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त रवि खंदारे यांनी सांगितले.