बीड येथे हिंसक आंदोलन करणार्यांवर कठोर कारवाई होणार !
बीड – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चालू झालेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात ३० ऑक्टोबर या दिवशी हिंसक वळण लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात आले होते. यासह जिल्ह्यातील माजलगाव नगर परिषदेच्या इमारतीलाही आग लावण्यात आली. आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता आरोपींना महागात पडणार आहे. आरोपींकडून अनुमाने ११ कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. बीड शहर आणि माजलगाव येथे झालेल्या हिंसाचारात ११ कोटी रुपयांची हानी झाली आहे. या सर्व हानीची वसुली या प्रकरणातील आरोपींकडून केली जाणार असून तसा अहवाल सिद्ध होत आहे. आरोपींनी ही भरपाई दिली नाही, तर त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून वसुली होईल, असेही ठाकूर यांनी दिली आहे.
१४४ आरोपींना अटक !
बीड येथे हिंसाचार आणि जाळपोळ करणार्या १४४ आरोपींना अटक, तर २ सहस्र जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध चालू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५०० हून अधिक जणांची चौकशी केली आहे.
६१ बसगाड्यांच्या दुरुस्तीचे काम चालू !
मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागल्यानंतर शहरातील बसस्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसगाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे बीड येथे जमावाने फोडलेल्या ६१ बसगाड्यांच्या काचा बसवण्याचे काम युद्धपातळीवर चालू करण्यात आले आहे. यासाठी २० लाख रुपयांच्या काचा हिमाचल प्रदेश येथून मागवण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बसगाड्यांची मागणी पहाता तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.