प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनीच्या १९ व्या वार्षिक अधिवेशनास भावपूर्ण वातावरणात ‘अधवूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’च्या जयघोषात प्रारंभ !
कोल्हापूर – समाज आणि व्यक्तीसाठी केवळ बाह्य विकास पुरेसा नसून आंतरिक विकासही अत्यावश्यक आहे. ‘प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनी’चा केंद्रबिंदू समाजाला सुसंस्कारित करणे असा आहे. आज समाज ज्या दिशेने चालला आहे, ते पहाता अशा संस्थांच्या कार्याची समाजाला आज आवश्यकता आहे. तरी धर्माचे कार्य पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी अध्यात्माचे प्रहरी (पहारेकरी) म्हणून आपण कार्य केले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. ४ नोव्हेंबर या दिवशी विश्वपंढरी येथे ‘प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनी’च्या १९ व्या वार्षिक अधिवेशनास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी, श्री. नितीन देशपांडे, सद्गुरु आनंदनाथ सांगवडेकर महाराज, अध्यक्ष डॉ. प्रदीप तराणेकर उपस्थित होते. स्वागत डॉ. श्वेता जेजुरकर यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते ‘श्री अनघदत्त संदेश’ या पत्रिकेच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. ४ आणि ५ नोव्हेंबरला होत असलेल्या या वार्षिक अधिवेशनात विविध व्याख्याने, कीर्तन, प्रबोधन, चर्चासत्रे होणार आहेत.
या प्रसंगी करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी म्हणाले, ‘‘धर्मात सांगितलेल्या नियमांचे आहे तसे पालन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. कोल्हापूर येथे प्रबोधिनीचे एक अध्यासन केंद्र निर्माण व्हावे आणि त्यातून आचारशुद्ध असणारे लोक निर्माण व्हावेत.’’
या अधिवेशनासाठी कोल्हापूर येथील श्रीविद्या शक्तिपात महायोगाश्रमाचे अध्यक्ष वेदमूर्ती सुहास जोशी, अधिवक्ता केदार मुनीश्वर, डॉ. सुरेश देशपांडे यांसह भारतभरातून आलेले ५०० हून साधक भगिनी उपस्थित आहेत.
या प्रसंगी प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. प्रदीप तराणेकर म्हणाले, ‘‘वर्ष २००२ मध्ये संस्थेची स्थापना झाल्यापासून प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज यांच्या साहित्याचा प्रसार-प्रचार करण्याचे महत्त्वाचे कार्य प्रबोधिनीच्या माध्यमातून होत आहे. स्वामी महाराजांचे बहुतांश साहित्य आता विविध भाषांमध्ये संकेतस्थळावर सहजपणे कुणालाही उपलब्ध आहे, हे प्रबोधिनीच्या कार्याचे मोठे यश आहे.’’
क्षणचित्रे
१. उद्घाटन सत्रात मधून-मधून ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’चा जयघोष करण्यात होता, तसेच वेदमंत्रपठणही करण्यात आले.
२. देशभरातून आलेल्या भाविक-अनुयायांमध्ये आध्यात्मिक कुटुंबभावना निर्माण झाली होती.