आंबोळगड, गणपतीपुळे, वेलदूर, कर्दे आणि वाल्मिकीनगर या गावांचा समावेश
रत्नागिरी – चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ७ नोव्हेंबर या दिवशी ‘टेबलटॉप एक्जरसाईज’ अर्थात् नियोजन, तर ९ नोव्हेंबर या दिवशी प्रत्यक्ष मॉकड्रिल (मॉकड्रिल म्हणजे आपत्कालीन रंगीत तालीम) होणार आहे. यात जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आंबोळगड, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, गुहागर तालुक्यातील वेलदूर, दापोली तालुक्यातील कर्दे आणि मंडणगड तालुक्यातील वाल्मीकिनगर या ५ गावांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिली.
चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणार्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत ‘दूरदृश्यप्रणाली’द्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील वरील ५ गावांमध्ये ९ नोव्हेंबरला सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान होणार्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने विशेष नियोजन करण्यात येणार आहे.
यामध्ये चक्रीवादळ आपत्ती निवारण रंगीत तालिमीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, करण्यात येणारी उपाययोजना, साधनसामुग्री उपलब्धता, मनुष्यबळ, किनार्यावरील नागरी वस्तीचे स्थलांतरण, करावयाची कार्यवाही, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, निवारा केंद्रे, फूड पॅकेट आदींविषयी या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.