वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिका एका नव्या परमाणू बाँबच्या निर्मितीची सिद्धता करत आहे. अमेरिकी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा बाँब दुसर्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमावर टाकलेल्या बाँबपेक्षा २४ पटींनी अधिक शक्तीशाली असेल. अमेरिकी संरक्षण विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. यासाठी लागणारा निधी पुरवण्याची प्रक्रियाही चालू करण्यात आली आहे. ‘बी ६१ न्यूक्लियर ग्रॅव्हिटी बाँब’ या आधीच्या बाँबचे आधुनिक रूप म्हणून ‘बी ६१-१३’ असे या नव्या बाँबचे नाव असणार आहे.
अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय संरक्षण नीतीचे उपसचिव जॉन प्लम्ब यांनी सांगितले की, पालटते संरक्षण वातावरण आणि विरोधकांकडून वाढती संकटे, यांकडे पहाता ही घोषणा करण्यात आली आहे.
हिरोशिमा आणि नागासाकी यांच्यावर टाकलेल्या बाँबशी तुलना !
नव्या बाँबचे वजन ३६० किलो टन असणार आहे. द्वितीय महायुद्धात हिरोशिमावर टाकलेल्या बाँबचे वजन १५ किलो टन होते, तर नागासाकीवर टाकलेल्या बाँबचे वजन २५ किलो टन होते. यामुळे नवा बाँब हा अनुक्रमे २४ पट आणि १४ पट अधिक मोठा असणार आहे. यासमवेतच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हा बाँब आधुनिक संरक्षण आणि अचूकता यांच्यासंदर्भात अधिक उजवा असणार आहे.
संपादकीय भूमिकारशिया, उत्तर कोरिया अथवा इराण यांनी या दृष्टीने काही केले असते, तर पश्चिमी युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या शक्तींनी आकाश-पाताळ एक करत त्यांना विरोध केला असता. आता मात्र कुणीच तोंडातून एक चकार शब्दही काढणार नाही, हे जाणा ! |