महाबळेश्‍वर (सातारा) येथे दुर्गामाता मिरवणुकीत विद्युत् जनित्राचा स्‍फोट होऊन ९ जण घायाळ !

जखमी मुलांना रुग्णालयात नेत असताना स्थानिक रुग्णवाहिका

सातारा, २६ ऑक्‍टोबर (वार्ता.) – महाबळेश्‍वर येथील दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत विद्युत् जनित्राचा (जनरेटरचा) स्‍फोट झाला. या मिरवणुकीत सहभागी झालेली ३ ते ७ वयोगटातील ७ लहान मुले अन् २ तरुण असे एकूण ९ जण होरपळून घायाळ झाले आहेत. घायाळ झालेल्‍यांना उपचारांसाठी ग्रामीण रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे. यामध्‍ये ३ मुलांची प्रकृती गंभीर असून त्‍यांना पुणे येथे उपचारांसाठी हलवण्‍यात आले आहे.

२४ ऑक्‍टोबर या दिवशी दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्‍या कोळी आळी येथील दुर्गामाता उत्‍सव समितीच्‍या ट्रॅक्‍टरवर रात्री ८ वाजता स्‍फोट झाला. ट्रॅक्‍टर ट्रॉलीवर जुने विद्युत् जनित्र चालू करून ठेवण्‍यात आले होते. पाईप गंजल्‍यामुळे त्‍याला गळती लागली होती. विद्युत् जनित्र शेजारीच २ लिटर पेट्रोलचा कॅन भरून ठेवण्‍यात आला होता. पेट्रोल गळतीमुळे विद्युत् जनित्राने पेट घेतला. त्‍यामुळे जवळच असलेल्‍या २ लिटर पेट्रोलच्‍या कॅननेही पेट घेतला. ट्रॉलीमध्‍ये बसलेल्‍या लहान मुलांना ट्रॉलीमधून उड्या मारता न आल्‍यामुळे ते या आगीमध्‍ये होरपळून निघाले. प्रसंगावधान राखत तेथीलच दोन युवकांनी आगीमध्‍ये उड्या घेऊन लहान मुलांना आगीतून बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्‍थळी आले.

दुर्घटना घडली, तेव्‍हा बाजारपेठेत डीजेच्‍या (‘डीजे’ म्‍हणजे मोठ्या आवाजातील ध्‍वनीक्षेपक यंत्रणा) दणदणाटात आणि ढोल-ताशांच्‍या गजरात महिलांचा दांडिया चालूच होता. घडलेल्‍या घटनेचे कुणालाही सुवेरसुतक नव्‍हते. कोणत्‍याही मंडळाने आगीत घायाळ झालेल्‍या मुलांची ही घटना गांभीर्याने न घेता नाचगाणे चालूच ठेवले होते. नागरिक आणि मंडळाचे पदाधिकारी यांनी दाखवलेल्‍या या असंवेदनशीलतेविषयी शहरामध्‍ये तीव्र शब्‍दांत संताप व्‍यक्‍त केला जात आहे.

संपादकीय भूमिका :

लहान मुले आगीत घायाळ झाल्‍यावरही दांडिया चालू ठेवणे म्‍हणजे समाजातील असंवेदनशीलतेने गाठलेली परिसीमाच होय !