‘भारतातील प्रचलित कायद्यांप्रमाणे अनेक धर्मांतील लोकांना वेगवेगळ्या परिस्थितीत घटस्फोट घ्यायचा किंवा मागायचा अधिकार प्राप्त होतो. ‘हिंदु विवाह कायदा १९५५’नुसार जे हिंदू आहेत त्यांना जर लग्नाचा घटस्फोट हवा असेल, तर कलम १३ प्रमाणे अनेक कारणांसाठी तो घेता येतो. या कलमामध्येही अनेक उपकलमे आहेत. ‘हिंदु विवाह कायदा’ हा मुसलमान अाणि ख्रिस्ती यांना लागू पडत नाही. ‘हिंदु’ या धर्मासमवेतच जैन, शीख, बौद्ध या पंथांतील लोकही ‘हिंदू’च समजले जातात आणि त्यांनाही हा कायदा लागू पडतो. विविध कारणे जी न्यायालयात सिद्ध केली जातात आणि त्या कारणांमुळे ‘विवाह कसा टिकूच शकत नाही ?’, असेही न्यायालयात जेव्हा सिद्ध केले जाते, तेव्हा ‘डिक्री ऑफ डिव्होर्स’ (घटस्फोटाचा निर्णय) मिळतो आणि लग्न संपुष्टात येते. अनेक कारणांमध्ये एक कारण असे आहे, ज्याचे नाव आहे ‘इन्सॅनिटी’, म्हणजेच वेडसरपणा !
१. न्यायालयात आवश्यक पुराव्यांच्या आधारे ‘वेडसरपणा’ सिद्ध करणे महत्त्वाचे !
वैद्यकीयदृष्ट्या (क्लिनिकल) वेडसरपणा हा असा निकष आहे की, जो न्यायालयात सिद्ध केला, तर घटस्फोट मिळू शकतो. हे काम म्हणावे तेवढे सोपे नक्कीच नसते. नवरा जर वेड्यासारखा वागत असेल, तर बायकोला आणि बायको जर वेड्यासारखी वागत असेल, तर नवर्याला घटस्फोट मिळू शकतो. वैद्यकीय पटलावर, कागदपत्रांच्या आधारे आणि इतर आवश्यक पुराव्यांच्या आधारे माननीय न्यायालयात ‘वेडसरपणा’ सिद्ध करावा लागतो. मा. सर्वाेच्च न्यायालयाने ‘राम नारायण विरुद्ध रामेश्वरी १९८९’ या खटल्यामध्ये निवाडा देतांना असे नमूद केले आहे की, नुसते ‘मानसिक विकार’ (मेंटल ऑर्डर) सिद्ध करून चालणार नाही, तर पुढे जाऊन त्या व्यक्तीसमवेत ‘संसार’ चालवणे, हे विवेकदृष्ट्या आणि वस्तूस्थितीला धरून किती अवघड अन् अशक्यप्राय आहे’, हेही न्यायालयात सिद्ध करावे लागते. केवळ वेडसरपणा, मानसिक विकार, वैद्यकीयदृष्ट्या विकारग्रस्त आहे, हे एवढेच सिद्ध करून भागणार नाही, तर ते पूर्णपणे सिद्ध करावे लागते.
२. वेडसरपणाच्या तीव्रतेनुसार न्यायालयाची प्रक्रिया
वरील खटल्यामध्ये बायकोला ‘स्क्रिझोफ्रेनिया’ (गंभीर स्वरूपाचा एक मानसिक विकार) झालेला होता. या विकारामध्ये रुग्णाचा मेंदूवर ताबा रहात नाही. मन, विचार, आचार आणि व्यवहार यांमध्ये ताळमेळ बसत नाही. ‘बायकोला हा विकार जडल्यामुळे कधी कधी ती आत्महत्या करण्याकडे झुकू शकते, तर कधी कधी ती हिंसक वळणाकडे झुकू शकते. त्यामुळे या अशा व्यक्तीसमवेत सहजीवन व्यतीत करणे कसे अवघड आहे’, हे न्यायालयात सिद्ध करावे लागते. वेडसरपणा यालाही काही स्तर (स्टेजेस) असतात. साधा, किरकोळ, हार्माेनिक, गंभीर, अतीगंभीर, हाताबाहेर गेलेले असे अनेक स्तर असतात. त्यामुळे प्रत्येक प्रकरण हे त्याच्या ‘मेरिट्स’ (लाभ) आणि ‘डि-मेरिट्स’ (तोटे) यांवर चालवले जाते. येथील मुद्दे तंतोतंत दुसरीकडे चालतीलच, असे नाही. त्यामुळे प्रत्येक खटल्याकडे न्यायालय वेगवेगळ्या दृष्टीने बघते. न्यायालयासमोर जी रुग्ण व्यक्ती उपस्थित असते, तिच्या ‘रिहॅबिलिटेशन’चाही (पूर्वपदावर आणण्याचाही) विचार न्यायालयाला करावा लागतो. एक माणूस म्हणूनही त्या व्यक्तीचा न्यायालय विचार करते. मग वेड्यांचे रुग्णालय किंवा गंभीर उपचार यांवर ही न्यायालय भर देते. ‘स्क्रिझोफ्रेनिया’मध्येही वेगवेगळे स्तर असतात. प्रत्येक स्तर आणि त्याची तीव्रता यांप्रमाणे न्यायालय वेगवेगळे निकाल देऊ शकते.
३. ‘वेडेपणा’विषयीची वैद्यकीय कारणे न्यायालयात सिद्ध हाेणे महत्त्वाचे !
पुष्कळदा नवरा-बायकोच्या न्यायालयीन भांडणात ती/तो ‘अस्वस्थ मना’च्या स्थितीमध्ये आहे, तसेच ‘वेडेपणा’ या सदरात समोरची व्यक्ती मोडते’, असे आरोप केले जातात; पण जे आरोप गंभीररित्या सिद्ध केले जातात, त्यांनाच अधिवक्त्यांनी त्यांच्या केसमध्ये स्थान द्यावे. अशिलांनीही ही गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. वेडा असणे आणि कधीकधी वेड्यासारखे वागणे यांत भेद आहे. ‘कन्वल्शन’ (आचके देणे), वेडसरपणाचे झटके येणे, मेंदूवरील ताबा सुटणे, हिंसक पशूसारखे वागणे, फिट येणे, फेफरे येणे’, अशी वैद्यकीय कारणे न्यायालयात सिद्ध करावी लागतात. जर कारणे खरी असतील आणि न्यायालयाला ती पटली, तर नक्कीच घटस्फोटाचा निर्णय मिळतो; पण उगाच वाटले म्हणून ‘वेडेपणा’चे कारण वापरू नये. जे साक्षी पुराव्याने सिद्ध होईल, तेच मुद्दे न्यायालयात घेणे आवश्यक आहे. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे ‘त्या व्यक्तीसमवेत रहाणे किती अशक्य, धोकादायक, प्राणघातक, संकटात टाकणारे आहे, हेही न्यायालयाला पटवून द्यावे लागते’, हे प्रामुख्याने मा. सर्वाेच्च न्यायालयाने नमूद केलेले आहे.’
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.