गोवा : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याने पोलीस हवालदाराच्या विरोधात बनवेगिरीचा गुन्हा प्रविष्ट

पणजी, २० ऑक्टोबर (वार्ता.) : सुटी घेण्यासाठी मये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकार्‍याची बनावट स्वाक्षरी करून वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याच्या प्रकरणी पणजी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार नितेश चोडणकर याच्या विरोधात बनवेगिरीचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. खात्यांतर्गत अन्वेषणात पोलीस हवालदार नितेश चोडणकर दोषी आढळल्याने त्याला गत आठवड्यात सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली. (निलंबित नव्हे, अशा पोलिसांना बडतर्फ करणेच योग्य ! – संपादक)

पोलीस हवालदार नितेश चोडणकर यांनी आजारी असल्याचे एकूण ६ अर्ज मये प्राथमिक आरोग्य केंद्रातील आधुनिक वैद्यांच्या स्वाक्षरीनिशी सादर केले होते. या घटनेचे अन्वेषण करण्याचा आदेश वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिला होता. या अर्जावर वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धी कासार यांची स्वाक्षरी असल्याने त्यांच्याकडे या अर्जाविषयी गोवा पोलिसांनी स्पष्टीकरण मागितले होते. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धी कासार यांनी ‘पोलीस हवालदाराला प्राथमिक आरोग्य केंद्रातून आजारी सुटी देण्यात आलेली नाही  आणि अर्जावरील स्वाक्षरीही माझी नाही’, असे स्पष्टीकरण दिले. पोलीस हवालदार नितेश चोडणकर याने सुटीसाठी अर्ज केल्याची प्राथमिक आरोग्य केंद्रातही नोंद नाही. त्यामुळे हे सर्व ६ अर्ज बनावट असल्याचा अहवाल डॉ. सिद्धी कासार यांनी पोलीस खात्याला पाठवला होता.

राज्यात गेल्या काही मासांपासून पोलीस खात्यात लाच घेणारे, गुन्हेगारांना साहाय्य करणारे आदी गुन्हे करणारे पोलीस कर्मचारी आढळत आहेत.

संपादकीय भूमिका

  • पोलीस खात्यात गुन्हेगारी वृत्तीचे पोलीस कर्मचारी आढळण्याचे वाढते प्रमाण पोलीस खात्याची विश्वासार्हता नष्ट करते !
  • पोलीस प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना नैतिकतेचे शिक्षण दिले जात नाही का ?