गणेशोत्सवानंतर सध्या सर्वच स्तरांवर ‘डीजे’च्या (डॉल्बी ध्वनीक्षेपक यंत्रणेच्या) वापराविषयी पुष्कळ प्रमाणात चर्चा चालू आहे. जनमानसातूनही पुष्कळ प्रतिक्रिया येत आहेत, तसेच तीव्र असंतोष आणि खेद व्यक्त होत आहे. ‘डीजेवर बंदी आणावी’, असे जनतेलाही वाटते. अनेकांकडून मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडेही पत्राद्वारे बंदीविषयी मागणी करण्यात आली आहे. सध्या नवरात्रोत्सव चालू आहे. त्या पार्श्वभूमीवरही दुष्परिणाम घडवणार्या ‘डीजे’चा सर्वांगीणदृष्ट्या विचार व्हायला हवा !
१. उत्सवांचे पालटते स्वरूप !
कोणत्याही मिरवणुकीमध्ये ‘डीजे’ एक व्यक्ती वेगवेगळ्या संगीताचे मिश्रण करून (रिमिक्स) त्याचे प्रसारण करतो. सध्या ही आवश्यक गोष्ट झाली आहे. मोठ्या आवाजात कर्णकर्कश संगीत लावून लोक त्याच्या तालावर बेभान होऊन नाचतात. तो आवाज जितका अधिक मोठा, कर्णकर्कश, तितका नाचणार्याचा उत्साह अधिक असतो. मग ‘त्या आवाजाचा कुणाला काही त्रास होतो का ?’, याचेही भान कुणालाही नसते. उत्सव साजरे करतांना उत्साह निश्चित हवा आणि त्या उत्सवाचा आनंदही घ्यावा; परंतु दिवसेंदिवस त्या उत्सवातून आनंद मिळवतांना त्याच्या अतिरेकाने किंवा अती उत्साहाने सर्वांनाच त्रास होत आहे. उत्सवाचे एकूणच स्वरूप पालटले आहे.
२. ‘डीजे’मुळे झालेले गंभीर परिणाम !
काही काळापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका शिक्षकाला ‘डीजे’च्या आवाजाचा त्रास होऊन चक्कर आली. नंतर ते कोमात जाऊन त्यांचे निधन झाले. भंडारा जिल्ह्यातील तरुणाला डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास होऊन कायमचा बहिरेपणा आला. पुण्यातील एका कार्यक्रमात एका लोकप्रतिनिधीच्या कानाचा पडदा फाटला. तो कार्यक्रम त्यांनी स्वतःच आयोजित केला होता. एका लग्नाच्या मंडपातच वराला डीजेचा त्रास होऊन चक्कर आली.
३. डेसिबलची मर्यादा पाळावी !
मिरवणुकीला किंवा वरातीला दिलेली वेळ, वाद्याची अनुमती आणि त्याची क्षमता, म्हणजेच डेसिबल यांवर नियंत्रण असावे; कारण ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजावर बंदी आहे आणि असा आवाज कुणासाठीही धोकादायक ठरू शकतो. दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४० डेसिबल इतकी मर्यादा असायला हवी; पण याचे नेहमीच उल्लंघन केले जाते. यामुळे बहिरेपणा येण्याची शक्यता असते. रक्तदाब, हृदयविकार या आजारांच्या रुग्णांना धोका असतो. यावर्षी मुंबई, पुणे, नाशिक येथे ‘लेझर’च्या प्रखर प्रकाशाने अनेकांना डोळ्यांची समस्या उद्भवली आहे.
४. पोलिसांच्या मर्यादा !
माझ्या परिचयातील एक गृहस्थ आहेत. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. त्यांच्या घरापासून जवळच २ ते ३ मिनिटांच्या अंतरावर जवळपास दीड ते दोन घंट्यांपासून डीजेवर कर्णकर्कश आवाजात गाणे लावले होते. त्यांना त्रास व्हायला लागला; म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क करून आपले म्हणणे सांगितले. त्यावर पोलिसांनी ‘बंदोबस्त करणार’ असे सांगितले. प्रत्यक्षात तेथील लोकांनी पोलीस हवालदारालाही परत पाठवले. पोलीस अधिकार्यांनी विनंती करूनही आवाजाचे प्रमाण न्यून झाले नाही. वेळेची मर्यादा संपून गेल्यानंतर मग डीजेचा आवाज बंद झाला. त्यानंतर पोलीस अधिकार्यांनी संपर्क करून सांगितले, ‘‘मी स्वत: विनंती करूनही संबंधित लोक ऐकायला सिद्ध नव्हते. तुम्ही यात आणखी काही करू नका. महागात पडेल ! आम्हाला नोकरी करायची आहे.’’
५. नियम आणि कायदा यांचीकार्यवाही होणे आवश्यक !
थोडक्यात काय, तर नियम आहेत, कायदाही आहे; परंतु त्यांची कार्यवाही अशा गोष्टींमुळे केली जात नाही. अनुमती देतांना वेळ आणि आवाजाची मर्यादा या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवायलाच हवे. आवाजाची मर्यादा मोजण्यासाठी योग्य ते साधन पुरवायला हवे. ते जर पाळले नाही, तर कारवाई व्हायलाच हवी. दहीहंडीमध्ये थरावर थर चढवतांना अनेक गोविंदा मृत्यूमुखी होतात; पण तरीही दहीहंडीतील गैरप्रकार थांबत नाहीत. बैलांच्या शर्यतीत दोघे घायाळ होतात; पण तरीही त्या शर्यती बंद झालेल्या नाहीत. डीजेमुळे सामान्य जनतेला त्रास होतो. कर्णकर्कश आवाजामुळे बहिरेपणा येऊन मृत्यू होतो; पण तरीही डीजेवर बंदी येत नाही, हेही तेवढेच सत्य आहे. या समस्येवर उपाय म्हणून समाजातील सर्वच घटकांनी एकत्रितपणे चर्चा करण्याची आवश्यकता आहे.
आता राजकीय नेत्यांनी आपली मानसिकता पालटावी. उत्सवात राजकीय हस्तक्षेप नसावा आणि उत्सवात सहभागी होणार्या सर्वांनीच समाजभान ठेवावे एवढेच अपेक्षित आहे !
– श्री. दिलीप देशपांडे, जामनेर, जिल्हा जळगाव.