समजावादी पक्षाचे नेते आझम खान, त्यांची पत्नी आणि मुलगा यांना प्रत्येकी ७ वर्षांच्या कारावाची शिक्षा !

निवडणूक लढण्यासाठी मुलगा अब्दुल्ला याचे बनावट जन्म प्रमाणपत्र बनवले !

आझम खान, अब्दुल्ला आणि तंजीन फातिमा

रामपूर (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आझम खान, त्यांची पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला यांना प्रत्येकी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा स्थानिक न्यायालयाने केली आहे. मुलगा अब्दुल्ला याचे बनावट जन्म प्रमाणपत्र बनवल्याच्या प्रकरणी ही शिक्षा करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत तिघेही जामिनावर बाहेर होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर तिघांनाही न्यायालयातच कह्यात घेण्यात आले.

सौजन्य इंडिया टूडे 

१. आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला याच्याकडे २ जन्म प्रमाणपत्रे आहेत. रामपूर येथे जन्म प्रमाणपत्र बनवण्यात आले होते. दुसरे प्रमाणपत्र लक्ष्मणपुरी येथे बनवण्यात आले होते. शैक्षणिक प्रमाणपत्रात अब्दुल्ला याचा जन्मदिनांक १ जानेवारी १९९३ आहे, तर जन्म प्रमाणपत्राच्या आधारे त्याची जन्मदिनांक ३० सप्टेंबर १९९० असल्याचे नमूद केले आहे. निवडणूक लढवतांना हे समोर आले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोचल्यानंतर अब्दुल्ला याने सादर केलेला जन्मप्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले. यानंतर त्याची मतदारसंघातील निवडणूकही रहित झाली. निवडणूक लढवण्यासाठी त्याने  जन्मदिनांक वाढवल्याचे आढळून आले.

२. भाजप नेते आणि आमदार आकाश सक्सेना यांनी वर्ष २०१९ मध्ये रामपूरच्या गंज पोलिस ठाण्यात अब्दुल्ला याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता. शिक्षेच्या निर्णयावर आमदार आकाश सक्सेना म्हणाले की, हा सत्याचा विजय आहे. त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली आहे. भविष्यातही त्यांच्याविरुद्ध प्रलंबित खटल्यांमध्ये त्यांना शिक्षा होईल, असा मला विश्‍वास आहे. सत्याच्या लढाईत सत्याचाच विजय होतो.