राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी गोवा सिद्ध ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

  • मल्लखांब, योगासने असणार खास आकर्षण ! 

  • पणजी येथील कांपाल मैदानातील क्रीडा नगरीत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल !

मडगाव, १७ ऑक्टोबर (वार्ता.) : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, तसेच त्या अनुषंगाने गोव्यात येणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी गोवा राज्य आणि गोवा सरकार सज्ज झाले आहे. गोव्यात होणारी ही महत्त्वाची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोव्यात तयारी पूर्णत्वाला येत आली आहे. या स्पर्धेचा खेळ होणार्‍या मैदानांची पहाणी मी केली आहे.

फातोर्डा येथील श्री दामोदर लिंगाच्या ठिकाणी श्री दामोदरदेवाचे दर्शन घेतांना  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,  क्रीडामंत्री गोविंद गावडे आणि इतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ ऑक्टोबर या दिवशी जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या स्पर्धेचे उद्घाटन करणार असून त्याचीही सिद्धता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ६.३० वाजता उद्घाटन समारंभाला मैदानात उपस्थित रहाणार असून त्यापूर्वी दोन-अडीच घंटे सर्वांनी मैदानात येऊन स्थानापन्न होणे आवश्यक आहे. पणजीतील कांपाल मैदानात क्रीडा नगरी साकारत असून या क्रीडा नगरीत गोव्याच्या मातीतील पारंपरिक कला, संस्कृती यांची ओळख करून देणारे कार्यक्रम होणार आहेत. मल्लखांब, योगासने हे उद्घाटन सत्राचे खास आकर्षण असणार आहे. मल्लखांबात गोव्याने चांगली कामगिरी केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फातोर्डा येथे दिली. या वेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी क्रीडामंत्री गोविंद गावडे, शासकीय अधिकारी यांच्यासमवेत फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमची पहाणी केली. फातोर्डा येथील श्री दामोदर लिंगावर श्री दामबाबाचे (श्री दामोदर देव) दर्शन घेऊन नारळ ठेवला आणि ‘राष्ट्रीय स्पर्धा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट निर्विघ्नपणे पार पडू दे’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर फातोर्डा मैदानात सर्वत्र फिरून तयारीचा आढावा घेतला आणि महत्त्वाच्या सूचनाही केल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरील माहिती दिली.

पंतप्रधानांसाठी हॅलीपॅड उभारण्याचे नियोजन रहित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी फातोर्डा परिसरात हॅलीपॅड उभारण्याचे नियोजन रहित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दाबोळी विमानतळावर उतरून त्यानंतर थेट खास वाहनाने फातोर्डा येथील मैदानात येणार आहेत, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस आमचे निरंतर प्रयत्न चालू आहेत. स्पर्धेच्या ७ दिवस पूर्वी सर्व मैदाने सज्ज करण्याची सिद्धता ठेवण्यात आली आहे.