पौराणिक ग्रंथांतून देवीदर्शन

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…

‘नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ।।

अर्थ : देवी महादेवी आणि शिवा हिला सतत नमस्कार असो. प्रकृति आणि भद्रा हिला नमस्कार असो. देवीला आम्ही नित्य वंदन करत आहोत.

देवीची शक्ती उपासना अनेक तपांपासून केली जात आहे. मानवाच्या इतिहासाच्या इतकेच प्राचीनत्व शक्ती उपासनेस आहे. स्त्रीरूपांत, देवीरूपांत मानवाने देवत्व कल्पिले आहे. मातृदेवता मानवी संस्कृतीच्या इतिहासातील आद्यशक्ती असून तिचे सर्व प्रकारच्या ग्रंथांतून असलेले स्थान आढळून येते. ऋग्वेदांतील अदितीपासून ते आजही दारी येणार्‍या गोंधळींच्या गीतांतील भवानी-रेणुकेपर्यंत शक्तीचा महिमा ऐकावयास मिळतो, तर सिंधूच्या तिरी मिळालेल्या ३ सहस्रांपूर्वीच्या मातृमूर्तीपासून खेडोपाडी आजही प्रभावशाली असलेल्या ग्रामदेवतेपर्यंत तिच्या उपासनेचे सातत्य आढळते. भारतामध्ये ५१ शक्तिपीठांचा इतिहास आहे. अनेक घराण्यांतून दुर्गा, काली आदी देवतांचे पूजन चालते.

सनातन-निर्मित श्री महालक्ष्मीचे सात्त्विक चित्र

१. ‘बृहत्नंदिकेश्वर’ पुराणामध्ये नवरात्रीच्या संबंधाने केलेले वर्णन

‘बृहत्नंदिकेश्वर’ पुराणामध्ये असे वर्णन आहे की, रावणवधाच्या आधी प्रभु श्रीरामाने दुर्गादेवीचे पूजन केले. त्याने हे पूजन आश्विन मासात केले. त्यामुळे या मासात देवीचे नवरात्र असते. नारदांच्या आज्ञेवरून रामाने हे पूजन नवरात्र व्रताचे आचरण करून केले. व्रताचे उद्यापन केल्यावर विजय मिळावा, अशी प्रार्थना केली. नंतर आपल्या वानरसैन्यासह लंकेवर आक्रमण केले आणि रावणाचा वध केला.

२. आद्यशंकराचार्य अणि अन्य संतांनी केलेली देवीस्तुती

आद्यशंकराचार्यांनी देवीस्तुती म्हणून केलेल्या स्तोत्रांची संख्या ४० पेक्षा अधिक आहे. महाराष्ट्र्रासंबंधी सांगायचे झाले, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदासस्वामी या संतश्रेष्ठींनीही शक्तीवर्णनावर थोडीबहुत स्तोत्ररचना केल्याचे आढळून येते.

सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीचे सात्त्विक चित्र

३. देवीसंप्रदाय

भारतात देवतोपासनेस अनुलक्षून जे पंथ वा संप्रदाय निर्माण झाले, त्यात देवी वा शक्ती किंवा मातृदेवता पूजक संप्रदाय हा फार प्राचीन आणि सर्वव्यापी आहे. देवता शास्त्रात पंचदेवोपासनेस प्रमुख स्थान आहे. निर्गुण वा निराकार परतत्त्वाचे सगुण वा साकार प्रतीक कल्पून त्याची भक्ती करणे आणि अनुग्रहाच्या अपेक्षेने संपूर्ण जीवन त्याचे पूजन, कीर्तन, भजन, नामस्मरण यांत व्यतित करणे, ही पद्धत भारतीय भक्तीमार्गाची विशेषता आहे. विष्णु, शिव, सूर्य, गणपति आणि देवी या देवतांची पूजा केली जाते.

४. देवीची ५१ नावे

१. श्रीदेवी, २. अंबिका, ३. अभयांबा, ४. अमयेरमाताजी, ५. अलक्ष्मी, ६. आनंदनायकी, ७. उनाईमाता, ८. उमा, ९. काळरात्री, १०. कुडिका, ११. कुळकुल्या, १२. कौशिकी, १३. कंकाळी, १४. गजांतलक्ष्मी, १५. गोत्रदेवी, १६. गौरी, १७. चंद्रवदनीदेवी, १८. चंद्रघंटा, १९. कूष्मांडा, २०. ब्रह्मचारिणी, २१. महागौरी, २२. सिद्धदात्री, २३. स्कंदमाता, २४. शैलपुत्री, २५. चक्रपदी, २६. जगद्धात्री, २७. दुर्गा, २८. नीलसरस्वती, २९. पद्मावती, ३०. प्रत्यंगिरा, ३१. पार्वती, ३२. पंपावती, ३३. बगलामुखी, ३४. बळातिबळा, ३५. भुवनेश्वरी, ३६. महिषासुरमर्दिनी, ३७. महाकाली, ३८. महासरस्वती, ३९. माखनदेवी, ४०. मुकाम्बिका, ४१. योगेश्वरी, ४२. रासईदेवी, ४३.  वृंदा, ४४. विद्यादेवी, ४५. वैष्णवी, ४६. शताक्षी, ४७. वत्सलादेवी, ४८. शिवदूती, ४९. सहस्रकाळमाता, ५०. संज्ञा, ५१. हुंकारेश्वरी.

५. देवीचे प्रिय फूल आणि प्रिय रंगाचे वस्त्र कोणते ?

६. देवी महात्म्य ग्रंथ

देवीच्या उपासकांचा एक प्रमुख ग्रंथ हा मार्कंडेय पुराणांत (अध्याय ८९ ते ९३) आहे. त्यात ५६७ श्लोक असून ते १३ अध्यायांत विभागलेले आहेत. या ५६७ श्लोकांचे ७०० मंत्रांमध्ये विभाजन केले असल्यामुळे हा ग्रंथ ‘दुर्गासप्तशती’ या नावाने ओळखला जातो. देवीमहात्म्यात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा देवीच्या त्रिविध स्वरूपांची चरित्रे ग्रंथित झालेली आहेत.

‘एक पीठ ते तुळजापूर । द्वितीय पीठ ते माहूर । तृतीय पीठ ते कोल्हापूर । अर्धपीठ सप्तशृंगी ॥’ महाराष्ट्रांत आदिमातेची साडेतीन पीठे धार्मिकदृष्ट्या आणि स्थानदृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. देवी भागवतात या तीर्थस्थानांचा उल्लेख आहे. तसेच महानुभावांच्या वाङ्मयांतही मातापूर, कोल्हापूर या शक्तिपीठांचे उल्लेख आढळतात. मातापूर आणि सप्तशृंगी या ठिकाणी श्री रेणुकादेवीचे स्थान असून कोल्हापूरला श्री महालक्ष्मी अन् तुळजापूरला श्री भवानी या देवींचे वास्तव्य आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रांतील अनेक घराण्यांची कुलदेवी यांच चारपैकी एक असते.’

– ज्योतिषी श्री. ब. वि. तथा चिंतामणि देशपांडे (गुरुजी), पुणे.

(साभार : मासिक ‘धार्मिक’, ऑक्टोबर २०१८)