सध्या चालू असलेल्या ‘नवरात्रोत्सवा’च्या निमित्ताने…
‘श्री दुर्गासप्तशती’ हा सनातन धर्माचा सर्वमान्य असा ग्रंथ आहे. याच्या आधारावर पाठांतर, पारायण मंत्र, शतचंडी इत्यादी अनेक प्रकारची अनुष्ठाने करतांना श्री दुर्गासप्तशतीचे पठण करण्याची परंपरा आहे.
१. श्री दुर्गासप्तशतीचा पाठ करण्याची कारणे !
अ. विविध प्रकारच्या कामनांची पूर्ती करणे आणि अनिष्ट संकटांचे निरसन करणे यांसाठी श्री दुर्गासप्तशतीचा किंवा चंडीपाठाचा काम्यप्रयोग होत असतो.
आ. मुमुक्षू आणि ज्ञानार्थी यांच्या दृष्टीने याचे महत्त्व असाधारण आहे.
इ. आर्त भक्तांसाठी देवीमातेचा पदर हाच एकमेव आश्रय आहे.
एवढे असूनही आज दुर्गासप्तशती केवळ पूजा-पाठ करण्याची एक पोथी बनून राहिली आहे. या पोथीची तात्त्विक पार्श्वभूमी, योगाचे विविध पैलू आणि आध्यात्मिक महत्त्व यांविषयी बहुतेक सूज्ञ लोकही अनभिज्ञच आहेत.
२. देवसंस्कृती विश्वविद्यालयाच्या योगविज्ञान विभागाच्या विद्यार्थिनीने श्री दुर्गासप्तशतीवर केलेले संशोधनकार्य !
देवसंस्कृती विश्वविद्यालयाची ‘मानवी चेतना आणि योगविज्ञान विभागा’ची संशोधक विद्यार्थिनी चारु शर्मा हिने नोव्हेंबर २००८ मध्ये श्री दुर्गासप्तशतीवर संशोधनात्मक अध्ययन कार्य केले. याचा विषय होता, ‘श्री दुर्गासप्तशतीमध्ये योगाचे विविध पैलू – एक विवेचनपूर्ण अध्ययन !’ हे अध्ययन कुलाधिपती डॉ. प्रणव पंड्या यांच्या देखरेख, निर्देशन आणि डॉ. ईश्वर भारद्वाज यांच्या सहनिर्देशनाखाली करण्यात आले. या गहन आणि गूढ शोधकार्याला ७ अध्यायांमध्ये विभक्त करून हे अध्ययन करण्यात आलेे.
३. श्री दुर्गासप्तशतीमधील अध्यायांची विभागणी आणि त्यातील माहिती
३ अ. शक्ती उपासनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी : यात वैदिक युग, उत्तरवैदिक युग, महाकाव्यकाळ, रामायण आणि महाभारत काळ, पौराणिक काळ अन् त्यानंतरचा काळ या वेगवेगळ्या कालखंडात करण्यात येत असलेल्या शक्ती उपासनेच्या वेगवेगळ्या पद्धतींवर विवेचन करण्यात आले आहे.
३ आ. ज्ञानयोग : यात ‘देवी ब्रह्मरूप आहे. संपूर्ण जगतामध्ये हिच्या मायेचा विस्तार आहे’, हे स्पष्ट करण्यात आले आहे. महामायेच्या रूपाने देवीनेच भगवान विष्णूंसह देवादीकांंनाही योगनिद्रेमध्ये झोपवून ठेवले आहे. ‘हिच्या दुःस्तर मायेला पार करून जाणे फार कठीण आहे’, हे विशद करण्यात आले आहे. श्री दुर्गासप्तशतीमध्ये ब्रह्म, जगत आणि माया या ज्ञानयोगाच्या मूळ धारणा देवीच्या अवतीभोवती फिरत असतात’, असा उल्लेख आहे.
३ इ. भक्तीयोग : या अध्यायात प्रेम, श्रद्धा, विलास आणि समर्पण यांसारख्या भक्तीशी संबंधित विविध तत्त्वांचा विस्तृतपणे उल्लेख करण्यात आला आहे. श्री दुर्गासप्तशतीच्या वेगवेगळ्या श्लोकांत याचे प्रत्यंतर दिसून येते. यात ‘समर्पण, विसर्जन, विलय यांसह भक्तीची चरम उपलब्धता कशी साधता येते ?’, याचे फार सुंदर वर्णन पहायला मिळते. यानुसार सुरथ राजाला आपल्या सकाम भक्तीद्वारे अखंड राज्याची प्राप्ती होते, तर समाधी, वैश्य निष्काम भक्तीच्या वाटेने जाऊन क्रमाक्रमाने विवेक आणि वैराग्य यात प्रतिष्ठित होतो अन् शेवटी परमात्म्याला प्राप्त करून घेतो, म्हणजेच त्याला मोक्षाची प्राप्ती होते.
३ ई. कुंडलिनी योग : यात श्री दुर्गासप्तशतीमधील अनेक अध्यायांत दडलेले कुंडलिनीचे विविध प्रकार, रूपके आणि अलंकार यांचे अत्यंत सुंदर वर्णन करण्यात आले आहे. कुंडलिनी जागरणाचे पहिले रूप ‘प्राणोत्थान’ हे मानण्यात आले आहे. दुसरे रूप ‘प्रकाशमय अवस्थेची प्राप्ती’ आहे. श्री दुर्गासप्तशतीमध्ये कुंडलिनी जागरणाच्या विधीचे सूक्ष्म विवेचन आढळते. त्यात ती मूलाधारचक्रातून जागृत होऊन प्राणोत्थान करत वासनेचे रूपांतर करत मणिपूर आणि अनाहत या चक्रांना पार करते. नंतर ती आज्ञाचक्राच्या पलीकडील प्रकाशमय अवस्थेच्या दिशेने पुढे जाऊ लागते आणि सहस्रारच्या ठायी ज्ञान अन् आनंद यांच्या पूर्णावस्थेमध्ये प्रतिष्ठित होते; मात्र श्री दुर्गासप्तशतीमध्ये या चक्रांचा सरळ उल्लेख मिळत नाही; परंतु त्यांच्या जागरण आणि विकास यांच्या आनुषंगिक भावाच्या अवस्थेचे कूट वर्णन स्पष्ट रूपात करण्यात आले आहे. ते हृदयस्पर्शी करून घेण्यासारखे आहे.
३ उ. मंत्रयोग : यात श्री दुर्गासप्तशतीच्या प्रत्येक श्लोकाला मंत्रमय मानण्यात आले आहे. मंत्रांचा प्रकार मालामंत्राच्या रूपात स्वीकारण्यात आला आहे. त्यात ठिकठिकाणी बीजमंत्रही विखुरलेले दिसून येतात. खरे पहाता श्री दुर्गासप्तशतीला मंत्रांचा ग्रंथच मानले जाते. यात ‘विनियोगाची ५ अंगे, म्हणजेच ऋषी, छंद, देवता, बीज आणि तत्त्व या अंगांव्यतिरिक्त हा मंत्र अपूर्ण रहातो’, असे सांगण्यात आले आहे. या ५ अंगांच्या प्रयोगामुळेच ‘मंत्रशक्तीची सर्व आयामे जोडली जातात’, हे तत्त्व सांगण्यात आले आहे. ‘श्री दुर्गासप्तशतीतील तिन्ही चरित्रांचा विनियोग ‘जीवनाचा समग्र उत्कर्ष आणि उन्नती’ यांसाठी आवश्यक आहे’, असे जाणून तो करण्यात आला आहे. यात क्रमाक्रमाने तम, रज आणि सत्त्व यांचे जागरण, स्थापना अन् त्यांचे परिशोधन करण्यासाठी मंत्राचा प्रयोग करून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांची सिद्धी निश्चित मिळवता येते.
३ ऊ. वैज्ञानिक प्रयोग : सहाव्या अध्यायात श्री दुर्गासप्तशतीचे पठण आणि मंत्रजप यांच्या मानसशास्त्रीय प्रभावांचे ज्ञान करून घेण्यासाठी प्रयोगात्मक अध्ययन करण्यात आले. यात देवसंस्कृती विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांची अकस्मात् निवडपद्धतीद्वारे निवड करण्यात आली. यात २० ते २४ वर्षे वयोगटाच्या ६० विद्यार्थ्यांची निवड झाली आणि त्यानंतर त्यांना ३ गटांत विभक्त करण्यात आले. पहिल्या गटाला एक मासापर्यंत विनियोग आणि न्यास विधीसह ११ माला नवार्ण मंत्राचा नित्य जप करण्यास सांगण्यात आले. दुसर्या गटाला नवार्ण मंत्राशी संपुटित करून सप्तश्लोकी दुर्गापाठ करायला सांगण्यात आला. तिसर्या गटाला सर्वांत आधी विनियोग, न्यास, त्यानंतर एक माळ नवार्ण मंत्र, पाठ आणि शेवटी पुन्हा एक माळ नवार्ण मंत्रजप करायला सांगण्यात आले. या प्रयोगात विद्यार्थ्यांच्या प्रारंभिक आणि अंतिम परीक्षणासाठी एका प्रश्नावलीचा प्रयोग करण्यात आला. यात विद्यार्थ्यांच्या चिंता, मनाची मरगळ, अपराध बोध, थकवा, परत जाण्याची प्रवृत्ती, बाह्यमुखी प्रवृत्ती, उत्तेजना आणि ताणतणाव यांच्या पातळ्यांचे परीक्षण करण्यात आले. शेवटी परिणामात दिसून आले की, बाह्यमुखी प्रवृत्तींच्या व्यतिरिक्त सातही मानसशास्त्रीय स्थितीच्या पातळीमध्ये सार्थक प्रमाणात न्यूनता दिसून आली आणि बाह्यमुखी प्रवृत्तीच्या पातळीत सार्थक वाढ दिसून आली. यात दोन प्रयोगात्मक अध्ययन करण्यात आले.
अ. वेगवेगळ्या प्रकारच्या मंत्र प्रणालींचा (नवार्णमंत्र, श्री दुर्गासप्तशती, संमिलित रूपाने नवार्ण मंत्र आणि श्री दुर्गासप्तशती पठण) चिंता अन् भावनेच्या परिपक्वतेच्या पातळीवर प्रभाव पहाण्यात आला.
आ. दुसर्या प्रयोगात श्रीसूक्तमंत्राच्या पठणाचा उच्च रक्तदाबाच्या व्यक्तींवरील प्रभाव पडताळून पहाण्यात आला.
दोन्हीही प्रयोगांत भाग घेणार्या व्यक्तींमध्ये या दोन्ही प्रयोगांचा सार्थक परिणाम दिसून आला. प्रयोगात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या चिंतेच्या पातळीत सार्थक प्रमाणात न्यूनता आली आणि भावनेच्या परिपक्वतेच्या पातळीमध्ये वाढ दिसून आली. उच्च रक्तदाबाच्या व्यक्तींमध्ये ‘सिस्टॉलिक’ (वरच्या) आणि ‘डायस्टॉलिक’ (खालच्या) रक्तदाबाच्या पातळीत सार्थकपणे न्यूनता पहाण्यात आली.
श्री दुर्गासप्तशतीच्या अध्ययनाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या वरील प्रयोगांनी हे सिद्ध होते की, ज्यांचे सामान्य माणसाला ज्ञान नाही, अशी कित्येक रहस्ये या ग्रंथात दडलेली आहेत. या ग्रंथाचे महत्त्व समजून घेऊन निष्काम भावाने देवीची आराधना केली, तर व्यक्ती याचे अलौकिक अनुभव स्वतः घेऊ शकते.’
– श्री. मनोहर झोडे
(साभार : मासिक ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, गुरुपौर्णिमा विशेषांक २०१५)