‘देश प्रथम, सुटी नंतर’, अशी इस्रायली पर्यटकांची भावना !
पणजी, १४ ऑक्टोबर (वार्ता.) : इस्रायल आणि ‘हमास’ या आंतकवादी संघटनेमध्ये चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात पर्यटनासाठी आलेले इस्रायली नागरिक मायदेशी परतण्यास इच्छुक झाले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कठीण प्रसंगामध्ये कुटुंबासमवेत रहाणे आणि देशवासियांच्या साहाय्यासाठी संरक्षण दलात स्वयंसेवा करणे, यांसाठी पर्यटक मायदेशी परतत आहेत. इस्रायली पर्यटकांमध्ये ‘देश प्रथम, सुटी नंतर’, अशी भावना दिसून येत आहे.
गोव्यातील ‘चबाड हाऊस’ येथे ११ ऑक्टोबर या दिवशी अनेक इस्रायली नागरिक एकत्र आले होते. या वेळी इस्रायलचा नागरिक इटामार (वय २७ वर्षे) इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधीकडे म्हणाला, ‘‘मी एका आठवड्यापूर्वी गोव्यात आलो होतो; मात्र आता मला परत जायचे आहे. मला माझ्या देशाची आणि देशवासियांची सेवा करायची आहे. येथे बसून हिंसाचाराच्या बातम्या पहाणे त्रासदायक वाटत आहे.’’ चबाड हाऊसमध्ये इस्रायली नागरिक तथा मानसशास्त्रज्ञ डुडी हाही होता. डुडी मायदेशी परतून सैन्यात भरती होण्यासाठी उत्सुक आहे. सध्या इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यामधील संघर्षामुळे इस्रायलमधील तेल अविवला जाणारी काही विमान उड्डाणे रहित झालेली आहेत.
(सौजन्य : India Today)
संपादकीय भूमिका
|