गोव्यात खासगी क्रीडा विद्यापिठाचे स्वागत करू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलाची पहाणी करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (मध्यभागी) आणि इतर

पणजी, १२ ऑक्टोबर (वार्ता.) : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोवा सज्ज झाला आहे. गोव्यात क्रीडा क्षेत्राचा व्याप यापुढे पुष्कळ वाढणार आहे. यामुळे ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनंतर गोव्यात खासगी स्तरावर क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारकडे आल्यास आम्ही त्याचे स्वागत करू. क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यास गोवा सरकार सर्वतोपरी साहाय्य करेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात क्रीडा विद्यापीठ व्हायला पाहिजे, असे मला वाटते. काही संस्थांनी यात रस दाखवला आहे. जर एखाद्या खासगी संस्थेने ५० सहस्र चौ.मी. भूमी दाखवल्यास त्या संस्थेला विद्यापीठ चालू करता येईल. खासगी संस्थेला भूमी स्वत:चीच घ्यावी लागणार आहे. क्रीडा क्षेत्र हे भवितव्य घडवण्याचे एक साधन म्हणून अनेक जण त्याचा स्वीकार करणार आहेत. क्रीडा विद्यापीठ उभे राहिल्यानंतर खेळाडूंना क्रीडा साहित्य आणि क्रीडा प्रशिक्षण या  खर्चिक गोष्टींचा बोजा रहाणार नाही. गोव्यात क्रीडा क्षेत्राची स्थिती पालटेल.’’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली कांपाल येथील मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलाची पहाणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १२ ऑक्टोबर या दिवशी ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कांपाल येथील मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलातील मैदान आणि जलतरण तलाव संकुल यांच्या सिद्धतेविषयी पहाणी केली. या ठिकाणी स्पर्धेचे सर्वाधिक म्हणजे १३ क्रीडा प्रकार होणार आहेत. भव्य तंबू घालून या ठिकाणी क्रीडानगरी साकारली जाणार आहे. मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पहाणी केल्यानंतर सिद्धतेविषयी समाधान व्यक्त केले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने कांपाल येथील क्रीडानगरीत होणार विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कांपाल येथील क्रीडानगरीत केवळ क्रीडा चुरस नसेल, तर सायंकाळी विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही असतील. अधिकाधिक लोकांनी क्रीडानगरीला भेट द्यावी, या हेतूने सरकारने ही योजना आखली आहे. क्रीडानगरीमुळे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कांपाल ते मिरामार परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस विभागाला नियोजन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने मिरामार समुद्रकिनार्‍यावर ‘बीच स्पर्धा’ होणार आहे.