पुणे येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील सार्वजनिक नवरात्रोत्‍सवात धार्मिकतेसह सामाजिक उपक्रम !

पुणे येथील श्री महालक्ष्मी मंदिर

पुणे, ११ ऑक्‍टोबर (वार्ता) – श्री महालक्ष्मी मंदिर, ‘श्री बन्‍सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्‍कृतिक ट्रस्‍ट’च्‍या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्‍सवाचा प्रारंभ १५ ऑक्‍टोबरपासून होणार आहे. १५ ते २४ ऑक्‍टोबर या कालावधीत धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन मंदिरात करण्‍यात आले आहे. या वेळी ढोल-ताशा वादनसेवा, लेखिका-कवयित्री सत्‍कार, विविध शाळांतील शिक्षकांद्वारे भोंडला, नारी सन्‍मान सोहळा, महिला लष्‍करी अधिकारी सन्‍मान असे सामाजिक आणि सांस्‍कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. सार्वजनिक नवरात्रोत्‍सव महालक्ष्मी मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे, अशी माहिती ट्रस्‍टच्‍या प्रमुख विश्‍वस्‍त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१५ ऑक्‍टोबर या दिवशी चितळे उद्योगसमुहाचे गोविंद चितळे यांच्‍या हस्‍ते घटस्‍थापना होणार आहे. १६ ऑक्‍टोबरला श्रीसूक्‍त पठण होणार आहे. या वेळी विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे या उपस्‍थित रहाणार आहेत. उत्‍सवात महाराष्‍ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्‍कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतील मान्‍यवर मंदिरामध्‍ये दर्शनासाठी येणार आहेत. सुरक्षेच्‍या दृष्‍टीने सर्व काळजी घेण्‍यात आली असून पुणेकरांनी मोठ्या संख्‍येने उत्‍सवात सहभागी व्‍हावे, असे आवाहन ट्रस्‍टच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.