छत्रपती संभाजीनगर येथे विविध मागण्‍यांसाठी ब्राह्मण समाजाचा मोर्चा !

छत्रपती संभाजीनगर – सर्व ब्राह्मण संघटनांच्‍या वतीने विविध मागण्‍यांसाठी येथील विभागीय आयुक्‍त कार्यालयावर १० ऑक्‍टोबर या दिवशी मोर्चा काढण्‍यात आला. हा मोर्चा शहरातील वन्‍दे भारत सभागृहापासून प्रारंभ होऊन प्रमुख मार्गांवरून काढण्‍यात आला. या मोर्चात महिलांची संख्‍या लक्षणीय होती, तसेच पोलिसांचा बंदोबस्‍तही मोठ्या प्रमाणात होता.

ब्राह्मण समाजाच्‍या मागण्‍या अशा…

१. ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्‍यांना सर्व शिक्षण विनामूल्‍य करण्‍यात यावे.

२. ब्राह्मण समाजातील आर्थिक मागास घटकातील तरुणांना व्‍यावसायिक साहाय्‍यासाठी ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळ’ स्‍थापन करावे. यासाठी १ सहस्र कोटी रुपयांचे प्रावधान करण्‍यात यावे.

३. ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्‍यांसाठी प्रत्‍येक जिल्‍ह्यात वसतीगृह स्‍थापन करण्‍यात यावे.  प्रत्‍येक जिल्‍ह्याला परशुराम भवन देण्‍यात यावे.

४. ब्राह्मण पुरोहितांना मासिक ५ सहस्र मानधन देऊन त्‍यांची विविध मंदिरात नियुक्‍ती करावी.

५. ब्राह्मण समाजातील सेवकांना मिळालेल्‍या इनामी जमीन वर्ग-२ मधून वर्ग-१ संवर्गात पालट करण्‍यात यावे. त्‍याचा मालकी हक्‍क कायम करण्‍यात यावा.

६. ब्राह्मण समाजाच्‍या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करून सामाजिक विडंबनातून समाजाची मुक्‍तता करण्‍यात यावी.

७. परंपरागत राज्‍यातील मंदिरे ज्‍या त्‍या पूर्ववत् वंशपरंपरागत व्‍यवस्‍थापनाकडे हस्‍तांतरीत करण्‍यात यावी. म्‍हणजे मंदिराचे पावित्र्य आणि व्‍यवस्‍थापन सुस्‍थितीत अबाधित राहील.

८. स्‍वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करण्‍यात यावे. ब्राह्मण समाजाच्‍या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर झालेल्‍या पालटांचा चांगला-वाईट परिणाम शोधण्‍यासाठी अभ्‍यास गट अन् आयोग यांची शासनस्‍तरावर नेमणूक करण्‍यात यावी.