जेरुसलेम – आमच्या सरकारने सैन्यदलावरील सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे आमच्या सैन्याने हमासच्या ठिकाणांवर नियंत्रण मिळवले असून आम्ही आता पूर्ण शक्तीनिशी आक्रमण करणार आहोत. आम्ही गाझापट्टीचा चेहरामोहरा पालटून टाकू, अशी चेतावणी इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांनी त्यांच्या सैन्याला संबोधित करतांना दिली. ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ या वृत्तपत्राने हे वृत्त प्रसारित केले आहे.
गॅलेंट पुढे म्हणाले की, आमच्या सैन्याकडे परिस्थिती पालटण्याची शक्ती आहे. आम्ही फार हानी सोसली आहे. आता तुम्हाला पालट पहायला मिळेल. हमासलाही गाझापट्टीच्या स्थितीत पालट हवा होता, तो त्याला आता आम्ही करून दाखवू. गाझापट्टीची परिस्थिती १८० डिग्री पालटली जाईल. यापुढे गाझापट्टी जगाला कधीही तिच्या मूळ स्वरूपात दिसणार नाही. संपूर्ण शक्तीनिशी आणि कुठल्याही तडजोडीविना आम्ही लढू.