शाही ईदगाहच्या ठिकाणी असणार्‍या श्रीकृष्णजन्मभूमीला मान्यता देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

शाही ईदगाह मशिदीच्या ठिकाणी असणारी श्रीकृष्णजन्मभूमी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – मथुरा येथील शाही ईदगाह मशिदीच्या ठिकाणी असणार्‍या श्रीकृष्णजन्मभूमीला मान्यता देण्याची मागणी करणारी जनहित याचिका प्रयागराज उच्च न्यायालयाने फेटाळली. महक महेश्‍वरी यांनी वर्ष २०२० मध्ये ही जनहित याचिका प्रविष्ट केली होती. यामध्ये या परिसरात हिंदूंना पूजा करण्याची अनुमती देण्याचीही मागणी करण्यात आली होती.

या याचिकेत म्हटले होते की, या परिसरामध्ये पूर्वी मंदिर होते आणि ते पाडून तेथे शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली. द्वापर युगामध्ये येथे कंस राजाचे कारागृह होते. येथेच भगवान श्रीकृष्णाच्या माता-पित्यांना बंदी बनवून ठेवण्यात आले होते आणि येथेच भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला.