मुंबई – राज्यातील पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीला राज्यशासन ‘लेक लाडकी’ योजनेद्वारे १ लाख १ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देणार आहे. १० ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णय संमत करण्यात आला. अर्थमंथी देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना घोषित केली होती. या योजनेच्या अंतर्गत ‘लेक लाडकी’ या योजनेतून हा निधी दिला जाणार आहे. यामध्ये गरीब कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ सहस्र रुपये, मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ सहस्र रुपये, ६ वीत गेल्यावर ७ सहस्र रुपये, ११ वीत गेल्यावर ८ सहस्र रुपये आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ सहस्र रुपये इतके अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेल्या मुलींना हा लाभ मिळणार आहे. पहिल्या २ अपत्यांना हा लाभ मिळणार आहे. जुळ्या मुली असल्यास दोन्ही मुलींना स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ मिळणार आहे. या लाभासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा अल्प असावे.